ठाणे : हिरानंदानी इस्टेट येथील कावेसर तलावालगत सुशोभिकरणाचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून त्याला भागातील काही रहिवाशांचा आणि ठाण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध आहे. काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन याचिका तयार करण्यात आली होती. यावर ठाण्यातील चार हजारहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करत सुशोभिकरणास विरोध दर्शविला. येत्या काही दिवसांत रहिवाशांच्या माध्यमातून आंदोलन देखील उभे राहणार आहे. त्यामुळे आता कावेसर तलावालगतच्या सुशोभिकरणाचा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

हिरानंदानी इस्टेट भागातील कावेसर परिसरात तलाव आहे. या तलावात दुर्मिळ मानले जाणारे पांढरे कमळ आढळून येते. सुमारे १५० वर्ष जुना हा तलाव असून तलावाभोवती जैवविविधता आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी तसेच हिरानंदानी भागातील नागरिक या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी नेहमी जातात. हिरानंदानी इस्टेट भागात बगीचे आहेत. परंतु नैसर्गिक तलाव येथील रहिवाशांसाठी आकर्षणाचा भाग ठरतो. तलाव तसेच परिसरात अनेक पक्षी, वृक्ष देखील आहेत. या तलावालगत सुशोभिकरणाचा निर्णय ठाणे महापालिकेकडून घेण्यात आला आहे. नुकतेच त्याचे भुमिपूजन देखील झाले. परंतु या सुशोभिकरणास हिरानंदानी इस्टेट भागातील रहिवाशांनी आणि पर्यावरणवाद्यांनी विरोध सुरु केला आहे. येथे सुशोभिकरणाची आवश्यकता नाही. सुशोभिकरण झाले तर येथील जैवविविधतेवर त्याचा परिणाम होण्याची भिती नागरिक व्यक्त करत आहेत.

येथील रहिवाशांनी व्हाॅट्सॲप तसेच इतर समाजमाध्यमांद्वारे तलाव वाचविण्याची मोहीम हाती घेतली. काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन याचिका तयार करण्यात आली. यामध्ये चार हजारहून अधिक जणांनी स्वाक्षरी करून सुशोभिकरणास विरोध दर्शविला आहे. तसेच जनजागृतीसाठी परिसरात फलक उभारले गेले आहेत. येत्या काही दिवसांत विविध स्तरावर आंदोलन केले जाणार असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकट कावेसर तलाव परिसरात सुशोभिकरण केले जात आहे. तलावालगत सुशोभिकरणाची आवश्यकता नाही. सुशोभिकरणामुळे येथील जैवविविधतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईन याचिकावर स्वाक्षरी करून विरोध दर्शविला आहे. आम्ही कावेसर तलाव वाचविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे येत्या काही दिवसांत विविध माध्यमातून आंदोलन उभारले जाणार आहे. – निशांत बंगेरा, पर्यावरणवादी कार्यकर्ते.