ठाणे : ठाणे जिल्ह्यात आज मोठ्या संख्येने गणेश आणि गौरी मूर्तींचे विसर्जन होणार आहे. मंगळवारी ३४ हजार गणेशमूर्ती तर, १५ हजार गौरी मूर्तींचे विसर्जन पार पडणार आहे. यात १७३ सार्वजनिक गणेश मूर्ती तर ३४ हजार २९४ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश असणार आहे. यंदा गौरी आगमनाची तारीख उशिरा आल्यामुळे सात दिवसांच्या गणेशोत्सवासोबतच गौरींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे ठाण्यातील विसर्जन सोहळा अधिक उत्साहात पार पडणार आहे.
गणेशोत्सव आणि गौरीपूजन या दोन महत्त्वाच्या परंपरा महाराष्ट्रातील घराघरांत श्रद्धा आणि भक्तिभावाने साजऱ्या केल्या जातात. गणेशोत्सव प्रामुख्याने दहा दिवसांचा मानला जातो. मात्र, काही कुटुंबांत दीड, पाच, सात दिवसांच्या गणपतीची प्रथा आजही सुरू आहे. त्याचसोबत गौरीपूजनालाही तितकाच मान आहे. साधारणपणे गौरींचे आगमन गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी होते आणि दोन दिवसांच्या पूजनानंतर त्या निरोप घेतात. मात्र, यंदा पंचांगानुसार गौरी आगमनाची तारीख उशिरा आली. यावर्षी गौरींचे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी आगमन झाले आहे. त्यामुळे यंदा सात दिवसांच्या गणपतीसोबतच गौरीपूजनाचे दिवस आले आहेत. म्हणून सात दिवसांचे गणपती आणि गौरींचे विसर्जन एकाच दिवशी पार पडणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे, भिवंडी, कल्याण – डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे येतात. या शहरात आज तब्बल ३४ हजार ४६७ गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून त्याचसोबत १५ हजार ३२७ गौरीमूर्तींनाही निरोप दिला जाणार आहे. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून ढोल-ताशांच्या गजरात, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणा देत. तसेच ढोलताशाच्या गजरात, गुलालाची उधळण करीत, पारंपारिक वेशभूषेत भाविक मूर्ती विसर्जनासाठी नेणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा २३ कृत्रिम तलाव, ७७ टाकी विसर्जन व्यवस्था, १५ फिरती विसर्जन केंद्र, ९ खाडी घाट विसर्जन व्यवस्था आणि १० मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण १३४ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
परिमंडळानुसार विसर्जन आकडेवारी
परिमंडळ – सार्वजनिक – खासगी – गौरी
१) ठाणे – २२ – ५४०० – १७८२
२) भिवंडी – ३० – ७०१३ – ८८८
३) कल्याण – ५६ – ८५१८ – ६५०२
४)उल्हासनगर – ३१ – ५०२५ – ४४८५
५) वागळे इस्टेट – ३४ – ८३३८ – १६७०