वाहतूक विभाग पालिकेच्या मदतीने करणार प्रायोगिक तत्वावर सुरूवात

उल्हासनगरः उल्हासनगरच्या मध्यवर्ती भागात बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी भर पडते आहे. त्यामुळे अशा काही भागात सम विषम पद्धतीने वाहने उभी करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. यात सर्वप्रथम उल्हासनगरच्या कॅम्प दोन भागातील सपना उद्यान परिसरात प्रायोगिक तत्वावर सम विषय वाहनतळाचा प्रयोग राबवला जाणार आहे. नुकतीच ठाण्याच्या वाहतूक पोलीस विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली.

अवघ्या तेरा चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले उल्हासनगर शहर देशातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या शहरांपैकी एक आहे. उल्हासनगर महापालिकेच्या अहवालातील एका नोंदीनुसार शहरता अवघे ३९ टक्के क्षेत्र निवासी आहे. तर शहरातील बहुतांश म्हणजे ६१ टक्के क्षेत्र व्यापारी आहे. शहरात हजारो वाहने दररोज येजा करत असतात. तर लाखो ग्राहक – व्यापारी शहरात येत असतात. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर कायमच वर्दळ असते. अरूंद रस्त्यांमुळे शहर गेल्या काही वर्षांपासून कोंडीचा सामना करत आहे. त्यातच बेशिस्त वाहनचालक आणि बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे शहराच्या कोंडीत भर पडते आहे.

वाहनांच्या पार्किंगला शिस्त लावाली आणि त्यातून उत्पन्न मिळावे यासाठी उल्हासनगर महापालिकेने सशुल्क वाहनतळाचा प्रस्ताव मंजुर केला होता. मात्र व्यापारी आणि नागरी संघटनांच्या विरोधानंतर त्याची अंमलबजावणी रखडली. रस्त्यावरील वाहनतळाला शिस्त लावण्यासाठी आता वाहतूक शाखेने पुढाकार घेतला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प दोन भागात सपना उद्यान आहे. एका बाजूला उल्हासनगर महापालिकेचा मार्ग तर दुसऱ्या बाजूला फर्निचर बाजार अशा मध्यवर्ती ठिकाणी हे उद्यान आहे. येथे रहिवासी क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर असून शाळा, महाविद्याल, उद्यान, ग्रंथालय, व्यापारी वसाहत आणि वर्दळीचा कल्याण बदलापूर राज्यमार्ग शेजारी असल्याने सपना उद्यान परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र येथे रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडसर होतो. त्यामुळे या अडचणीला दूर करण्यासाठी वाहतूक शाखेने येथील प्रेम यश गृहसंकूल ते हरि किर्तन दरबारपर्यंतच्या दोन्ही बाजूंना सम विषम पार्किंग करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगित तत्तावर हा प्रयोग केला जाणार असून अमंलबजवाणी सुरू झाल्यापासून ३० दिवस हा प्रयोग चालेल. या प्रयोगाला यश मिळाल्यास तो पुढे चालू ठेवण्याबाबत आणि इतर रस्त्यांवरही याची अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्थानिक वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शहराच्या पार्किंगच्या दृष्टीने हा पहिला प्रयोग असून तो यशस्वी ठरतो का यावर शहरातील इतर पार्किंग व्यवस्थेचे भविष्य अवलंबून आहे.