डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे दररोज डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालया जवळील नवी मुंंबईकडे धावणाऱ्या बस दररोज सकाळी उशिरा येतात. वाशी बस थांब्यावरील प्रवाशांंना दररोज तासन तास नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बसची वाट पाहत थांंबावे लागते. या बस थांब्यावर परिवहन उपक्रमाकडून आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. रुग्ण, गर्भवती महिला अशा प्रवाशांचे यामध्ये हाल होतात.

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. या रस्त्या शिवाय अन्य मार्गाचा पर्याय नसल्याने नवी मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रास्त दरातील पर्याय म्हणून नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाच्या बस प्रवासासाठी योग्य वाटतात. तसेच, या बस नवी मुंबई भागातील औद्योगिक विभाग, बाजार समिती, व्यापारी संकुल, शासकीय कार्यालये, आस्थापना अशा कार्यालयांना वळसा घालून जात असल्याने प्रवाशांना प्रवासासाठी नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बस सेवा सोयीस्कर वाटते.

डोंबिवली शहर परिसरातील बहुतांशी नोकरदार नवी मुंबईतील एमआयडीसी, तळोजा, सीबीडी, वाशी, नेरूळ परिसरातील सरकारी कार्यालये, खासगी आस्थापना, कंपन्यांमध्ये नोकरी करतात. अनेक महाविद्यालयीन मुले नेरूळ, वाशी परिसरातील महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी जातात. त्यामुळे प्रवासासाठी या प्रवाशांना नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बसवर अवलंबून राहावे लागते. परंतु या बस महापे, शिळफाटा दिशेने येऊ लागल्या सकाळच्या वेळेत शिळफाटा रस्त्यावरील कोंडीत अडकतात. या बस वेळेत येत नसल्याने प्रवाशांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते.

डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील बस थांब्यावरून दर पंधरा मिनिटाने नवी मुंबईच्या दिशेने बस सुटतात. या सर्व बस शिळफाटा रस्त्यावरील कोंडीत सकाळच्या वेळेत येताना अडकल्या की या बसचे प्रवासी बस थांब्यावर ताटकळत राहतात. एक ते दोन किलोमीटरच्या रांगा अनेक वेळा शास्त्रीनगर रुग्णालय बस थांंब्याजवळ तयार होतात. बस येत नाही तोपर्यंत बसण्याची याठिकाणी सोय नाही. एक बस थांबा आहे. तो फक्त प्रवाशांना रांगेची शिस्त लावण्यासाठी आहे. त्या ठिकाणी बसण्याची सुविधा नाही.

याठिकाणी जुनाट झाडे आहेत. या झाडांवरील पक्षी सतत विष्ठा टाकत असतात. ही विष्ठा अनेक वेळा प्रवाशांंचा अंगावर पडून गणवेश खराब होतो. त्यामुळे या बस थांब्यावर उभे राहताना आपण उभे असलेल्या झाडावर पक्षी नाही ना हे पहिले पाहावे लागते. नवी मुंबई परिवहन उपक्रमाने शास्त्रीनगर बस थांब्यावर तात्पुरते निवारे आणि आसन सुविधा करण्याची प्रवाशांची मागणी आहे. पावसाळ्यात प्रवाशांचे या बस थांब्यावर सर्वाधिक हाल होतात.