कल्याण – ठाकुर्ली रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी १०.३१ वाजताच्या कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानच्या वातानुकूलित लोकलचे तिकीट ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवर न मिळाल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला. ऑनलाईन माध्यमातून रेल्वेच्या उपयोजनवर रेल्वे तिकीट मिळते. मग रेल्वे तिकीट खिडकीवर तिकीट का मिळत नाही, असे प्रश्न करून प्रवाशांनी तिकीट कारकुनाशी हुज्जत घातली.

आम्हाला रेल्वेच्या वरिष्ठांकडून कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान नेहमी धिम्या गतीने सकाळी १०.३१ वाजता सुटणारी वातानुकूलित लोकल बुधवारी जलदगती मार्गावर चालविण्यात येणार आहे. ही लोकल ठाकुर्ली रेल्वे स्थानकात थांबणार नाही, अशा सूचना आहेत. त्यामुळे आम्ही आपणास या वेळेतील वातानुकूलित लोकलचे तिकीट देऊ शकत नाही, अशी उत्तरे ठाकुर्ली रेल्वे तिकीट खिडकीवरील तिकीट कारकुनाकडून प्रवाशांना देण्यात येत होती.

गणेशोत्सव सुरू आहे. अनेक भाविक गणपती दर्शनासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती पाहण्यासाठी फिरत आहेत. तरूण, तरूणींचे जथ्थे गटाने गणपती दर्शनासाठी शहर परिसरात फिरताना दिसत आहेत. बुधवारी अनेक गणेशभक्त आपण वातानुकूलित लोकलने प्रवास करू या विचारातून ठाकुर्ली रेल्वे स्थानकात आले होते. काहींनी रेल्वेच्या उपयोजनवरून ऑनलाईन माध्यमातून कल्याण ते सीएसएमटी सकाळच्या १०.३१ वाजता ठाकुर्ली रेल्वे स्थानकात येणाऱ्या वातानुकूलित लोकलची तिकीट काढली होती. हे प्रवासी ठाकुर्ली रेल्वे स्थानकात येऊन वातानुकूलित लोकलने प्रवास करण्याचा विचार करत होते.

त्याचवेळी डोंबिवली, ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता परिसरातील अनेक प्रवासी ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवर येऊन सकाळच्या १०.३१ च्या वातानुकूलित लोकलची तिकिटे काढण्याचा प्रयत्न करत होते. पण तिकीट कारकुन वातानुकूलित लोकलचे तिकीट देण्यास नकार देत होता. आम्ही पैसे देतोय त्यामुळे येवो अगर न येवो आम्हाला वातानुकूलित लोकलचे तिकीट द्या, अशी मागणी करत काही प्रवासी हट्टाला पेटले होते. तिकीट कारकुन मी तिकीट देईन पण ती लोकलच ठाकुर्ली रेल्वे स्थानकात थांबणार नाही. त्यामुळे तुम्ही या लोकलचे तिकीट काढून जाणार कोठे. ते तिकीट फुकट जाईल, असे सांगत होता. काही प्रवासी रेल्वे उपयोजनवर ऑनलाईन माध्यमातून वातानुकूलित लोकलचे उपलब्ध असणारे तिकीट रेल्वे तिकीट कारकुनाला दाखवत होते.

आम्ही आमच्या वरिष्ठांच्या सुचनांचे पालन करणार, असे सांगून तिकीट कारकुन तिकीट प्रवाशांना देत नव्हता. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी १०.३१ वाजता येणारी वातानुकूलित लोकल धिमी आहे की ती जलद गतीने ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून धावणार आहे हे एकदा रेल्वे प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणी रेल्वे प्रवासी करत होते. या गोंधळामुळे अनेक प्रवाशांना वातानुकूलित लोकलने प्रवास करता येणार नाही असे समजल्याने त्यांचा हिरमोड झाला.