केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची जिल्हा प्रशासनाला २ जानेवारीपूर्वी कामे पूर्ण करण्याची सूचना

बदलापूर : भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या स्वातंत्र्ययुद्धातील बलिदानामुळे विशेष महत्त्व असणाऱ्या सिद्धगडावर विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामात गतिमानता आणण्याच्या सूचना केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिल्या आहेत. २ जानेवारीपूर्वी ही कामे पूर्ण करण्याचेही आदेश प्रशासनाला दिले आहेत.

मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यात आले आहे. दरवर्षी ठाणे, रायगड, पालघर, पुणे जिल्ह्य़ांतून अनेक लोक २ जानेवारी रोजी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली देण्यासाठी येत असतात. हे स्मारक आणि येथील सुविधांबाबत बुधवारी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 या बैठकीत स्मारकाजवळच्या सुविधांची वेगाने उभारणी करण्याचे आदेश मंत्री पाटील यांनी दिले. गेल्या चार वर्षांपासून येथील सिद्धगड स्मारक ते जांभुर्डे स्मारकापर्यंतच्या रस्त्याचे काम वन विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव पडून होता. त्याला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे येथे डांबरी रस्ता तयार करणे शक्य होणार आहे. तसेच स्मारकाचा विकास करत असताना भीमाशंकर पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्राच्या नियमांचा अडसर विकासकामांमध्ये होऊ नये यासाठी या स्मारकाचे क्षेत्र अभयारण्यातून वगळण्याची मागणी यावेळी स्मारक समीतीचे अध्यक्ष गोटीराम पवार यांनी केली. यासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन संबंधित विभागाकडे करण्याचे आश्वासन मंत्री कपिल पाटील यांनी दिले. यावेळी बोलताना मंत्री कपिल पाटील यांनी स्मारकाचे आणि येथील विविध विकासकामे तातडीने पूर्ण करावीत. येत्या २ जानेवारी रोजीच्या हुतात्मादिनी नागरिकांना सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे स्पष्ट आदेशही यावेळी पाटील यांनी दिले.