scorecardresearch

ग्रामसेवकांच्या घरासमोर भूमिपुत्रांच्या रांगा

एक जूनपासून २७ गावे पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यापूर्वीच ग्रामपंचायतींकडून गावात उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांना

एक जूनपासून २७ गावे पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यापूर्वीच ग्रामपंचायतींकडून गावात उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांना संरक्षण मिळवून घेण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ सुरू झाली आहे.
– या बांधकामांना कर लावून घेणे, ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे, ग्रामपंचायतीच्या सेवेत असल्याचे दाखवण्यासाठी मागच्या दाराने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे उद्योग काही ग्रामस्थांनी अगदी अखेरच्या दिवसापर्यंत सुरू ठेवल्याचे उघड होऊ लागले आहे.
– डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात एक ग्रामसेवक राहतो. रविवार असूनही या ग्रामसेवकाच्या घराबाहेर रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांची मोठी गर्दी दिसून येत होती. ग्रामपंचायतीकडून विविध प्रकारच्या परवानग्या, निधी संपवण्यासाठी विकास कामे मंजुरीच्या नस्ती (फाइल) मंजुरीसाठी जोरदार खटपट सुरू असल्याची चर्चा आहे. कोपर भागात दिवसभर महागडय़ा गाडय़ांची वर्दळ वाढल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत होते. अशीच परिस्थिती इतर ग्रामसेवकांच्या घराबाहेर होती. काही भूमिपुत्रांनी मुरबाड, शहापूर भागात राहत असलेल्या ग्रामसेवकांच्या घरी जाऊन बनावट कागदपत्र रंगवून घेतली असल्याचे समजते.
– ग्रामपंचायतीला यापुढील काळात कोणतेही अधिकार असणार नाही. हा विचार करून ग्रामपंचायतीमधील शिल्लक निधीची सदस्यांकडून धुळधाण करण्यात आली आहे. निळजे ग्रामपंचायतीमधील सुमारे २८ लाखांचा विकास कामांचा निधी लोढा हेवन संकुलात आठ दिवसांत संपवण्यात आला आहे.
– लोढा हेवनमधील रस्ते, पाणी, पदपथ या कामाकडे कधीही लक्ष न देणाऱ्या निळजे ग्रामपंचायतीने अचानक या भागात लाखो रुपयांची कामे सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘३१ मे रोजी सील’
– ग्रामसेवकांवर कोणी दबाव आणल्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. १ जून रोजी गावे पालिकेत समाविष्ट होणार आहेत, याची जाणीव असल्याने ३१ मे रोजीच ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व दप्तरे सील केली आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गडबड होण्याची शक्यता नाही, अशी माहिती कल्याणचे गटविकास अधिकारी बी. ए. घोरपडे यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2015 at 12:11 IST

संबंधित बातम्या