ठाणे – भारत देश हा जैवविविधतेने समृद्ध असून विविध वन्यजीव हे जीवसृष्टीचे अविभाज्य घटक आहेत. या वन्यजीवांचे संवर्धन आणि त्यांच्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान ‘भारतीय वन्यजीव सप्ताह’ साजरा केला जातो. या निमित्ताने पर्यावरण दक्षता मंडळातर्फे गेली २६ वर्षे निसर्गमेळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षीचा निसर्गमेळा ‘पिसूरी हरीण महोत्सव’ या संकल्पनेवर साजरा करण्यात येत आहे.
भारत देश जैवविविधतेने समृद्ध देश आहे. भारतात विविध प्रकारचे वन्यजीव अविभाज्य घटक मानले जातात. या वन्यजीवांचे महत्त्व, त्यांच्यातील परस्परसंबंध तसेच त्यांचे संवर्धन याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने इ स १९५४ पासून भारतीय वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. पर्यावरण दक्षता मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये जैवविधतेविषयी प्रबोधन व्हावे या उद्देशाने मागील २६ वर्षे निसर्गमेळा पार पडतो. यंदा निसर्गमेळा हावन्यजीव सप्ताहापुरता मर्यादित नसून सलग पंधरा दिवस विविध शाळांमध्ये पार पडला. यंदा पिसुरी हरीण महोत्सव ही या महोत्सवाची संकल्पना होती. पिसूरी हरीण हा जगातील सर्वात लहान खुर असलेला, लाजाळू आणि निशाचर प्राणी आहे. भारतातील दाट जंगलांमध्ये आढळणारा हा प्राणी फळे, पाने, कोवळे कोंब यांवर उपजीविका करतो. अधिवास नष्ट होणे आणि शिकारीमुळे त्यांची संख्या घटली असून सध्या तो वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात हे दिसून येते. विद्यार्थ्यांमध्ये या प्राण्याविषयी जागरूकता वाढवून वन्यजीव संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यासाठी यावर्षीची ही संकल्पना निवडण्यात आली.
विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग
या निसर्गमेळ्यात पाणी या विषयावर आधारित शाडू मातीपासून वन्यजीव तयार करणे, प्रश्नमंजुषा, कापडी पिशवी रंगविणे, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, मुखवटे बनविणे, घोषवाक्य तयार करणे, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
११२५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
ठाण्यातील हरकिशन शाळा, बेडेकर विद्यामंदिर, गौतम विद्यालय (इंग्रजी माध्यम), संकेत विद्यालय, श्रीरंग विद्यालय, शिवाई विद्यालय, ठाणे महापालिका शाळा क्र. ५३ आणि मुंबईतील विद्याधिराजे शाळा येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. एकूण १,१२५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
मान्यवर परीक्षकांचे योगदान
स्पर्धांचे परीक्षण लक्ष्मीकांत नाईक, डॉ. नरेंद्र जोशी, समृद्धी अग्निहोत्री, पल्लवी बांदोडकर, अदिती नेरकर, अंजली लेले, छाया मेस्त्री, कल्पना लाड, वैशाली वैद्य, मनोहर पाटील, प्रीती करंजकर, गणेश शेंडे, स्वाती पाटील, वंदना अडसूळ, विभावरी दामले, सतीश दामले, मनीषा मोडक, अस्मिता वाळिंबे, वसुधा बने, संध्या टेंबे, पौर्णिमा शिरगावकर, मनाली धांगडे, सुरभी ठोसर, चिन्मय गुंडाराम आणि राजश्री जोशी या परीक्षकांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणिबक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
संस्थात्मक सहकार्य
या उपक्रमासाठी डॉ. संजय जोशी, विद्याधर वालावलकर, डॉ. संजय देशमुख, पौर्णिमा शिरगावकर, मनाली धांगडे यांचे मार्गदर्शन लाभले. कीर्ती महाविद्यालय, ज्ञानसाधना विद्यालय आणि बांदोडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवा केली. तसेच इनरव्हील क्लब ऑफ ठाणे वेस्ट, लेक सिटी, मिडटाउन, गार्डन सिटी, हिरानंदानी इस्टेट, रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट, इनरव्हील क्लब ऑफ मुंबई मुलुंड वेस्ट आणि भांडुप यांनी प्रायोजकत्व दिले.