ठाणे : लोकसभा निवडणूकीत ‘अब की बार, मोदी सरकार’ हे घोषवाक्य संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाले होते. भाजपकडून निवडणूकांमध्ये आजही या घोषवाक्याचा वापर केला जातो. या घोषवाक्याचे जनक पियुष पांडे यांचे नुकतेच निधन झाले. या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. आव्हाड यांनी अब की बार मोदी सरकार या जाहिरातीचाही विशेष उल्लेख केला.

देशातील अनेक नामांकित कंपन्यांच्या जाहिरातींचे जनक पियुष पांडे यांचे निधन झाले. पांडे यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला. यह फेविकाॅल का जोड है तुटेगा नहीं, कुछ खास है हम सभी में अशा विविध जाहिरातींचे ते जनक होते. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांच्या एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर केली आहे.अब की बार, मोदी सरकार ही घोषणादेखील त्यांचीच होती. मी जरी विरोधक असलो तरी हे सांगतो की, पियुष पांडे यांनी तयार केलेली ही घोषणा लहान मुलांपासून मोठ्यांच्याही तोंडात बसली होती असे आव्हाड म्हणाले.

आव्हाड यांची एक्स पोस्ट…

भारतीय जाहिरात क्षेत्रातील एक कल्पक व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेले पियुष पांडे यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मला त्यांना भेटण्याची संधी प्राप्त झाली होती ती अमिताभ बच्चन यांच्यामुळे ! मी सन २०१४ मध्ये फलोत्पादन मंत्री असताना, आंबा, द्राक्ष, डाळिंब यांची जाहिरात करण्याचे ठरविले. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक रूपयाही न घेता त्यास होकार दिला अन् पियुष पांड्ये यांच्याशी माझी बैठक करून दिली.

जाहिरातींचे डिझाईन आणि नियोजन तेच करतील, असेही सांगितले. त्यानंतर पियुष पांड्ये यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या आंब्यापासून काजूपर्यंत; डाळिंबांपासून केळ्यांपर्यंतच्या फळांची जाहिरात अमिताभ बच्चन यांनी पियुष पांड्ये यांच्या सांगण्यानुसार केली. जाहिरात क्षेत्रातील दादा माणूस, अतिशय कल्पक ! किंबहुना, अब की बार, मोदी सरकार ही घोषणादेखील त्यांचीच होती. मी जरी विरोधक असलो तरी हे सांगतो की, पियुष पांड्ये यांनी तयार केलेली ही घोषणा लहान मुलांपासून मोठ्यांच्याही तोंडात बसली होती. असे हे कल्पक, नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले पियुष पांड्ये हे आपल्यातून निघून गेले. त्यांचे असे जाणे फक्त जाहिरात विश्वासह सर्वांनाच चटका लावणारे आहे. पियुष पांड्ये यांना भावपूर्ण श्रद्धांजली.