ठाणे : ठाणे येथील कॅडबरी चौकाच्या परिसरात एका डम्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. या घटनेमुळे ठाणे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून डम्परचालकाला अटक केली आहे.
राजकुमार चौधरी असे अटक करण्यात आलेल्या डम्पर चालकाचे नाव आहे. सुरेश भालेराव असे अपघातात मृत पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते ठाण्यातील वर्तकनगर येथील शिवाईनगर भागात राहत होते. ते ठाणे पोलिस दलात पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. त्यांची नेमणुक ठाणे पोलिस मुख्यालयात होती. सुरेश भालेराव हे शनिवारी सकाळी १०.३० वाजता कामावर जाण्यासाठी निघाले. दुचाकीने ते कामावर जात होते. कॅडबरी चौकात त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. ठाणे शहरातील कॅडबरी चौक हा वाहतूकीच्या दृष्टीकोनातून महत्वाचा मानला जातो.
या चौकात वर्तकनगर, खोपट, माजिवडा आणि ठाणे या भागातील चार रस्ते येऊन मिळतात. या चौकातील रस्त्यावरून शहरातील वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. याशिवाय, अवजड वाहनांचीही वाहतूक सुरू असते. या चौकात सिग्नल यंत्रणा असून त्याद्वारे येथील वाहतूकीचे नियोजन वाहतूक पोलिस करतात.
वाहनांची सतत वर्दळ असलेल्या चौकात सुरेश यांची दुचाकी आली. या चौकातील ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या वाहिनीवरून त्यांची दुचाकी जात होती. त्याचवेळी एक भरधाव डम्पर आला आणि त्याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते दुचाकीवरून खाली पडले आणि त्यात ते गंभीर जखमी झाले.
याठिकाणी असलेल्या नागरिकांनी अपघात पाहून तात्काळ धाव घेतली. कॅडबरी चौकातील वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी पोलिस कर्मचारी आणि वाहतूक सेवक तैनात असतात. त्यांनीही हा अपघात पाहून धाव घेतली. सुरेश हे रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडले होते. नागरिक आणि चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. या रुग्णालयातील डाॅक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचारही सुरू केले.
पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी डम्परचालक राजकुमार चौधरी याला अटक केली आहे, अशी माहिती राबोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक हेमंत पाटील यांनी दिली.