पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलने तीव्र झाली असून काही ठिकाणी रास्ता रोको आणि जाळपोळीचे प्रकार सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्तक झालेल्या ठाणे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील निवासस्थान परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. शिवाय, शहरातील राजकीय तसेच महत्त्वाच्या व्यक्तींच्या निवसास्थान परिसरातील सुरक्षेत पोलिसांनी वाढ केली आहे. तसेच पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> Video : भाजपचे आमदार किसन कथोरे यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी उपोषण होत आहेत. ठाणे शहरातही साखळी उपोषण सुरू आहे. त्याचबरोबर राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलने तीव्र झाली असून बीड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये संदीप क्षीरसागर आणि माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंखे यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली. मंत्री, खासदार, आमदार यांच्या वाहनांना अडविले जात आहे. अनेक ठिकाणी राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्या जाळण्यात आल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आमदार किसन कथोरे यांना ठाण्यात काळे झेंडे दाखविण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात घोषणाबाजी करण्यात आली होती. एकूणच राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील निवासस्थान परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राजन विचारे, आमदार जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक, संजय केळकर, निरंजन डावखरे, रविंद्र फाटक यांच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. शहरातील पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. याठिकाणीही बंदोबस्त वाढविण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असतो. शिंदे यांच्या निवासस्थान परिसराची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला. यानंतर याठिकाणी वागळे पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढविण्यात आला. येथील सेवा रस्ताही बंद करण्यात आला. त्यामुळे नितीन कंपनी येथून सेवा रस्त्याने लुईसवाडी, तीन हात नाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांना फेरा मारून प्रवास करावा लागत आहे. ठाण्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या घराबाहेर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहरात पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे. – महेश पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाणे शहर.