ठाणे : एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुले परदेशात, कौटुंबिक दूरावा आणि सामाजिक बदलामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहत असताना, त्यांच्या हक्कांचे रक्षण आणि कायदेशीर मार्गदर्शन व्हावे यासाठी एका संस्थेच्या माध्यमातून पोलिसांचे विशेष प्रशिक्षण सुरु केले जाणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांविरोधातील अत्याचाराविषयीच्या कायद्याची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात येत असावा असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य अधिक आहे. त्यातही जुन्या ठाण्यात हे प्रमाण जास्त आहे. मुले परिदेशात कामानिमित्ताने जातात. त्यानंतर ते तिथेच राहतात. तर काही प्रकरणांमध्ये कौटुंबिक वाद, विभक्त कुटुंब पद्धती यामुळे ज्येष्ठ नागरिक एकाकी जीवन जगत आहे. करोनाच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आरोग्यावरही अनेकदा परिणाम होत असतो. त्यांना एकटेपणा जाणवू नये यासाठी ठाणे पोलिसांकडून विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्यानुसार, पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतात, संवाद साधतात तसेच सण-उत्सवात देखील त्यांच्यासोबत उत्सव साजरे करतात. या उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.
असे असले तरी ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी कायदा आहे. तसेच, तक्रार दाखल झाल्यानंतर याप्रकरणात दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली जाऊ शकते. अनेकदा ज्येष्ठ नागरिक पोलीस ठाण्यात त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यास, हे घरगुती प्रकरण असल्याचे पोलीस कर्मचारी सांगतात. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर अधिकाराबाबत पुरेशी माहिती नसल्याने याप्रकरणांत गुन्हे दाखल होत नाहीत. या पोलीस कर्मचाऱ्यांना आता प्रशिक्षण देण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात. या क्षेत्रात पोलिसांचे ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट असे पाच विभाग असून एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत. येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे विभागानुसार प्रशिक्षण केले जाणार आहे. त्यामध्ये त्यांना ज्येष्ठ नागरिकांविषयीचे कायदे यासह विविध विषयांची माहिती दिली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही त्यांच्या हक्काविषयी माहिती दिली जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही अनेक उपक्रम राबविले आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आता पोलीस कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. – आशुतोष डुंबरे, आयुक्त, ठाणे पोलीस.
पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पोलीस काॅन्स्टेबल यांना प्रशिक्षण देण्याची तयारी आम्ही दर्शविली होती. पोलीस आयुक्तांनी त्यास होकार दिला. हा उपक्रम सुरु झाल्यास ज्येष्ठांच्या अत्याचाराला आळा बसण्यास मदत होईल. राज्यात अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम असावा. – ॲड. प्रमोद ढाकले, मानद विधी सल्लागार, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ.