उल्हासनगरः उल्हासनगर महापालिकेचा करभरणा करण्याकडे नागरिकांचा कल कमी होत असल्याने पालिकेच्या तिजोरीत कर कमी प्रमाणात गोळा होतो आहे. त्यामुळे सातत्याने पालिकेला अभय योजनेसारखे प्रयोग करावे लागतात. त्यामुळे कर भरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करण्याची गरज आहे. मात्र पालिकेच्या कर भरणा केंद्राच्या गंभीर दुरावस्था झाल्याचे समोर आले आहे. उल्हासनगरातील एक हात मदतीचा या सामाजिक संस्थेने उल्हासनगर महापालिकेच्या कर भरणा केंद्राची दुरावस्था उघडकीस आणली आहे.
एक हात मदतीचा या सामाजिक संस्थेने उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर भरणा केंद्रांच्या गंभीर दुरावस्थेबाबत उपआयुक्त (मालमत्ता कर विभाग) विशाखा मोटघरे यांना निवेदन दिले आहे. संस्थेचे अध्यक्ष विजय कदम, सचिव अतुल शिंदे आणि सदस्यांच्या उपस्थितीत सादर केलेल्या या निवेदनात, केंद्रांची अवस्था पाहता कर्मचारी आणि कर भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे.
उल्हासनगर शहरात २००९ साली पालिकेने नागरिकांना कर भरण्याची सुविधा सुलभ करण्यासाठी उल्हासनगरमधील १ ते ५ नंबर विभागांत सुमारे २० ते २२ कर भरणा केंद्रे उभारली होती. मात्र यातील बहुतांश केंद्रे अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे अतिशय जीर्णावस्थेत पोहोचली आहेत. काही केंद्रांमध्ये लाद्या-कडप्पे तुटलेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी उंदीर व घुशींनी केंद्रांना पोखरले आहे. काही केंद्रांचे पाय खचलेले असून काही ठिकाणी पावसाळ्यात पाण्याची गळती होते. या परिस्थितीत केंद्रात काम करणारे कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत असल्याचे दिसत आहे. कर भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही धोका निर्माण होत आहे. उद्या एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवालही निवेदनातून करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या केंद्रांमधून दररोज पालिकेचा मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो, तरीही सुरक्षा रक्षकांची नेमणूक नाही. अभय योजनेअंतर्गत ही केंद्रे रात्री ८ ते १० वाजेपर्यंत चालू असतात, त्यामुळे उशिरा येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनतो. संस्थेने उपआयुक्त मोटघरे यांना सर्व कर भरणा केंद्रांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची तसेच ही केंद्रे नव्याने बसविण्याची मागणी केली आहे.
उल्हासनगर महापालिकेचा मालमत्ता कराचा भरणा सातत्याने कमी होतो आहे. अशावेळी पालिकेने करभरण करण्यासाठी सुविधा देण्याची गरज आहे. मात्र तसे न होता केंद्रांची दुरावस्था समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.