कल्याण : उद्गघाटनानंतरच्या एक तासात खराब झालेल्या कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई निळजे उड्डाण पुलावर (एक्सपेरिया माॅलजवळ) प्रवाशांच्या पाठीचे कणे मोडतील अशा पध्दतीने खड्डे पडले आहेत. मागील काही दिवसांपासून या खड्ड्यांचा आकार वाढून हे खड्डे आता चंद्रावरच्या खड्ड्यांप्रमाणे दिसू लागले आहेत. एखादा प्रवासी, वाहनांचे या खड्डयांमुळे नुकसान होण्यापूर्वीच हे खड्डे बुजविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुढाकार घ्यावा, अन्यथा उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पुलावर आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा कल्याण ग्रामीणचे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी दिला आहे.
काटई निळजे रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाचे घाईने उद्घाटन केले. त्याचे दुष्परिणाम आता प्रवाशांना भोगावे लागत आहेत. पूल कामाच्या ठेकेदाराचा सल्ला घेऊन पूल सुरू केला असता तर आता या पुलावर खड्डे पडण्याची वेळ आली नसती. पण प्रत्येक कामाचे श्रेय घेण्याची काही राजकीय मंडळींची सवय पुलाच्या उद्घाटनाला घातक ठरली आहे, अशी टीका उपजिल्हाप्रमुख भगत यांनी केली आहे.
कल्याण शिळफाटा रस्त्यावरील कोंडीला काटई निळजे रेल्वे मार्गावरील पुलावरील (एक्सपेरिया माॅलजवळ) खड्डेही तितकेच जबाबदार आहेत. या पुलावरून वाहने चालविताना खड्ड्यांमुळे चालकांना वाहने हळू चालवावी लागतात. पुलाच्या मध्यभागी, दोन्ही बाजुच्या उतार भागावर खड्डे आहेत. त्यामुळे या पुलावरून कोणीही वाहन चालक सुस्थितीतपणे वाहन चालवू शकत नाही. या पुलावरून दररोज धावणाऱ्या मोटारातील, दुचाकीवरील प्रवाशांच्या पाठीचे कणे या खड्ड्यांमध्ये आपटून गळून पडण्याची वेळ आली आहे. या खड्ड्यांमुळे काही मोठा अपघात व्हावा याची वाट एमएसआरडीसी पाहत आहे का, असा प्रश्न राहुल भगत यांनी अधिकाऱ्यांना केला आहे.
अगोदरच शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडीने प्रवासी हैराण आहेत. त्यात काटई निळजे उड्डाण पुलावरील चंद्रावरील खड्ड्यांप्रमाणे पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. दररोज दिवसभरात चार ते पाच दुचाकी स्वार या खड्ड्यांमध्ये आपटत आहेत. नवखा दुचाकी स्वार, वाहन चालक या पुलावरून जात असेल तर तो नक्कीच या पुलावरील खड्ड्यात पडतो. काटई निळजे पुलाची खड्डयांमुळे झालेली दुरवस्था बघून हे खड्डे येत्या सात दिवसाच्या अवधीत भरण्यात यावेत, अन्यथा प्रवाशांच्या मागणीचा विचार करून या पुलावर ठाकरे पक्षातर्फे प्रवाशांच्या पुढाकारातून रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा उपजिल्हाप्रमुख भगत यांनी एमएसआरडीसी प्रशासनाला दिला आहे.