ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यात सुरु असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा रस्त्याची चाळण झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून प्रवाशांना,वाहन चालकांना धोकादायकरित्या वाहतुक करावी लागत आहे. शहरातील कोपरी, मुख्य आणि अंतर्गत मार्गावरील उड्डाणपूल, सिमेंट काँक्रिटचे मार्ग, घोडबंदर येथील रस्त्यांची वाईट अवस्था झाली असून भीषण अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
गेल्याकाही दिवसांपासून ठाणे शहरातील वाहतुक कोंडीमुळे नागरिक बेजार झाले आहेत. विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाचे सर्वाधिक हाल होत आहे. त्यातच ठाण्यातील बहुतांश रस्त्याची अवस्था अंत्यत वाईट झाली आहे. घोडबंदर, पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंबई नाशिक महामार्गावर राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. शहरातील रस्ते ठाणे महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांकडे येतात. त्यामुळे नेमके कोणत्या प्राधिकरणाकडे तक्रारी कराव्यात अशा संभ्रमात ठाणेकर आहेत. त्यातच ठाण्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. तर काही ठिकाणी मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत.
रस्त्यांची काय स्थिती
– शहरातील माजिवडा चौक हा घोडबंदर, पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंबई नाशिक महामार्गाला जोडतो. येथील चौकात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याबाबत वाहतुक पोलिसांनी प्राधिकरणांकडे पाठपुरावा केला असता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ठाणे महापालिकेकडून टोलवा टोलवी सुरु आहे. घोडबंदर मार्गावरील कासारवडवली, आनंदनगर, पातलीपाडा, वाघबीळ भागात रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. दररोज या मार्गावर वाहतुक कोंडी होत असल्याने या भागात राहणाऱ्या नोकरदारांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. ठाण्यातील अंतर्गत मार्गावरील मिनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूलावर खड्डे पडले आहेत. यातील काही खड्ड्यांचा आकार मोठा आहे. त्यामुळे हे खड्डे जीवघेणे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
ठाणे शहरातील महत्त्वाच्या अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मुख्य रस्त्यांवर देखील अशीच परिस्थिती आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक होते. परंतु तसे झालेले नाही. दररोज सर्वसामान्यांना वाहतुक कोंडी आणि खड्ड्यांचा त्रास सहनन करावा लागत आहे. यामध्ये इंधन देखील वाया जात आहे. – रोशन जाधव, प्रवासी.