बदलापूर : एकीकडे शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणाला यश येताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांची अंधारवारी वाढली आहे. त्यातच आठवड्याच्या पहिल्या दिवशी बदलापूर पश्चिमेत देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी अकराच्या सुमारास वीज पुरवठा बंद करण्यात आला. मात्र बदलापूर पश्चिमेतील मांजर्ली भागात म्हात्रे चौकात रस्ते खोदकामात वीज वाहिनी तुटली. त्यामुळे या भागातील शेकडो घरे रात्री उशिरापर्यंत अंधारात होती. त्यामुळे आधी देखभाल दुरुस्ती तर नंतर खोदकामामुळे नागरिकांना वीज शिक्षा सोसावी लागली.

बदलापूर शहरातील वीज पुरवठा सुरळीत होताना दिसत नाही. बदलापूर पूर्व भागातील वीज समस्या गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यात गेल्या महिन्यात एकाच वेळी अपघात, वीज स्त्रोतांमध्ये झालेले बिघाड आणि वीज पुरवठा करणारी वाहिनी तुटल्याने सलग दिवस अनेक तास वीज पुरवठा खंडित झाला होता. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या तक्रारींच्या सातत्यामुळे अधीक्षक अभियंत्यांना बदलापुरात यावे लागले होते. त्यानंतर युद्ध पातळीवर दुरुस्तीची कामे संपवावी लागली. तर काही अधिकाऱ्यांची उचलबांगडी सुद्धा करावी लागली. शहरात जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी विजेच्या समस्येवरून महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

त्यानंतर विजेचा लपंडाव काही अंशी कमी झाला होता. मात्र देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा दिवसदिवसभर वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रकार आजही सुरू आहेत. शुक्रवारी बदलापूर पूर्व परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर शनिवारीही काही भागात वीज गायब होती. त्यामुळे शुक्रवारी कसली देखभाल दुरुस्ती केली, शनिवारी पुन्हा वीज कशी खंडित झाली असा प्रश्न नागरिक विचारत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर सोमवारी बदलापूर पश्चिमेतील नागरिकांना हीच वीज शिक्षा सहन करावी लागली. बदलापूर पश्चिमेत देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्याचा फटका बेलवली, मांजर्ली, वालीवली, हेंद्रपाडा भागातील नागरिकांना बसला. तर सायंकाळी सातच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला खरा, मात्र अवघ्या काही मिनिटांत पुन्हा वीज गायब झाली. त्यानंतर मांजर्ली भागात म्हात्रे चौकात रस्ते कामात सुरू असलेल्या खोदकामात वीज वाहिनी तुटली. त्यामुळे मांजर्ली आणि आसपासच्या भागातील वीज पुरवठा बंद झाला होता. त्याचा फटका शेकडो नागरिकांना बसला. आधीच दिवसभर विजेविना राहिलेल्या नागरिकांना रात्री उशिरापर्यंत अंधारात काढावे लागेल. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत होते. रात्री साडे आठ वाजेपर्यंत वीज वाहिनी जोडण्याचे काम सुरू असल्याची माहिती बदलापूर पश्चिमेचे उपअभियंता यांनी दिली.