ठाणे : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे मिरारोड येथे मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाला गेले असताना, त्यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली. त्यानंतर त्यांना मोर्चानंतर काढता पाय घ्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी ठाण्यात येऊन माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा महामेरू त्यांच्या खांद्यावर घेतला आहे. आम्ही त्यांचे सहकारी म्हणून काम करत आहोत. परंतु मनसे आणि उबाठाला आंदोलन आणि घोषणाबाजी शिवाय काही येत नाही. मनसे आणि उबाठाला महापालिका निवडणूका झाल्यानंतरही विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारचीच भूमिका घ्यावी लागणार आहे अशी टीका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मनसे आणि ठाकरे गटावर केला. मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केला. तरी मी कोणाला भीक घालणार नाही असेही ते म्हणाले.
प्रताप सरनाईक हे मिरारोड येथील मराठी एकीकरण समितीच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली. तसेच, त्यांच्या दिशेने पाण्याची बाटली देखील भिरकाविण्यात आली होती. यानंतर पोलिसांच्या गराड्यामधून प्रताप सरनाईक हे पुन्हा ठाण्याच्या दिशेने निघून आले. ठाण्यातील कासारवडवली येथील उड्डाणपूलाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण सुरू झाले आहे. मराठी जनांच्या मोर्चाला सहकार्य करण्यासाठी मी गेलो होतो. परंतु उबाठा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी माझ्याविरोधात काही घोषणाबाजी केली.
निवडणूकांच्या तोंडावर हे सर्व होत राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा महामेरू त्यांच्या खांद्यावर घेतला आहे. आम्ही त्यांचे सहकारी म्हणून काम करत आहोत. परंतु त्यांना आंदोलन आणि घोषणाबाजी शिवाय काही येत नाही. मनसे आणि उबाठाला महापालिका निवडणूका झाल्यानंतरही विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारचीच भूमिका घ्यावी लागणार आहे अशी टीका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मनसे आणि ठाकरे गटावर केली. मोर्चामध्ये अडविण्यात आल्याबाबत त्यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता, मी सक्षम आहे. मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केला नाही, आणि प्रयत्न केला तरी मी कोणाला भीक घालणार नाही असेही ते म्हणाले.