कल्याण – डोंबिवलीत मी १९८० ते १९९० च्या दरम्यान रिक्षा चालवित होतो. या रिक्षेचा परवाना आपण कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन घेतला होता. एक रिक्षा चालक म्हणून यापूर्वी कल्याण उपप्रादेशिक कार्यालयात येत होतो. ज्या कार्यालयात आपण रिक्षेचा परवाना रांगेत उभा राहून घेतला. त्याच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा आपल्या उपस्थितीत होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी आपल्या जीवन प्रवासाची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कल्याण येथील उंबर्डे भागातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारत उद्घाटनाच्या कार्यक्रमात रविवारी दिली.

उंंबर्डे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी मंत्री सरनाईक यांनी आपल्या जीवन प्रवासातील एक किस्सा सांगितला. या कार्यक्रमात उत्कृष्ट प्रवासी देणाऱ्या पाच प्रामाणिक रिक्षा चालकांचा सन्मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मंत्री सरनाईक यांनी रिक्षा चालक असतानाच्या आपल्या ४५ वर्षा पूर्वीच्या जीवन प्रवासाला उजाळा दिला.

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोबतीला रिक्षा चालक मालक संघटनेचे शेखर जोशी, आप्पा जोंधळे, बाळू नरोटे, शंकर कांबळे आणि इतर रिक्षा चालक असत. मंत्री सरनाईक यांनी आपल्या रिक्षा चालक असलेल्या प्रवासाचा किस्सा सांगताच, त्यांच्या जुन्या रिक्षा चालक सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.आमचा एका जुना रिक्षा चालक मित्र परिवहन मंत्री झाला आहे याचाही आम्हाला अभिमान आहे, असे या रिक्षा चालकांनी सांगितले. सरनाईक हे यापूर्वी प्रताप गांडोळे या आडनावाने ओळखले जात होते. डोंबिवली सोडल्यानंतर त्यांनी आपले आडनाव बदलले, असा अनुभव रिक्षा चालकांनी सांगितला.

आरटीओच्या आरक्षणाच्या विविध भागातील ५४ भूखंड झोपडपट्ट्यांनी व्यापले आहेत. या जागा रिकाम्या करून परिवहन विभागाकडे दिल्या तर आम्ही त्या जागा सार्वजनिक खासगी भागीदारी पध्दतीने चांगल्या विकसित करू शकतो. या माध्यमातून आरटीओ कार्यालयांना चांगल्या सुस्थितीत इमारती मिळतील आणि या माध्यमातून परिवहन विभागाचा महसूलही वाढले, अशी मागणी मंत्री सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.नागरिकांना चांगली सेवा देताना ते कार्यालय प्रशस्त पाहिजे. ही फक्त एक इमारत नसून या इमारतीमधून लोकाभिमुख, कल्याणकारी सेवा नागरिकांना दिली पाहिजे. आरटीओ विभाग हा सर्वाधिक महसूल देणारा विभाग आहे. या विभागालाही चांगली कार्यालये मिळाली पाहिजेत तरच अधिकारी, कर्मचारी वर्ग चांगली कामे करू शकतो, ग्राहक सेवा देऊ शकतो. कल्याण आरटीओ कार्यालयाचे अनेक वर्षाचे नव्या इमारतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या कार्यालयाच्या जागेसाठी निवृत्त वरिष्ठ अधिकारी रवींद्र कुलकर्णी यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. उंबर्डे येथील जागेत दोन माळ्याची प्रशस्त इमारत उभारण्यात आली आहे.