Ghodbunder ठाणे – घोडबंदर भागातील पातलीपाडा उड्डाणपुलावरून सोमवारी दुपारच्या सुमारास जात असलेल्या गँस टँकरला आग लागल्याची घटना उघडकीस आली. आग विजविण्याच्या कामात अडथळे येऊ नये आणि अपघात होऊ नये यासाठी उड्डाणपुलावरील वाहतूक अर्धा तास बंद करून ती पुलाखालील रस्त्यावरून वळविण्यात आली होती. यामुळे या मार्गावर कोंडी झाली होती. त्याचा फटका या मार्गावरील प्रकल्पांच्या कामाची पाहाणी करण्यासाठी आलेले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाही बसला.
घोडबंदर मार्ग हा ठाणे आणि मुंबई या महानगरांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा मोठा भार असतो. हा मार्ग राष्ट्रीय महामार्गांशी जोडलेला आहे. एक टँकर महापेहून गुजरातच्या दिशेने घोडबंदर मार्गे जात होता. या टँकरमध्ये १९ टन लिक्वीड आरगॉन गॅस होता. हा टँकर महापेहून गुजरातच्या दिशेने जात होता. हा टँकर पातलीपाडा पुलावर येताच, अचानक त्या टँकरला आग लागली. यानंतर टँकर चालकाने सुरक्षेच्या कारणास्तव गाडी बंद केली आणि तो टँकरमधून खाली उतरला. या घटनेची माहिती मिळताच, शहर वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी १ क्रेन, २ टोविंग व्हॅन, चितळसर पोलीस स्टेशनचे अधिकारी- कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. चालक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वेळेत टँकरमधून बाहेर पडल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
या टँकरला लागलेल्या आगीचा भडका हा मोठा होता. संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. यामुळे इतर वाहने देखील तेथेच थांबून होती. ही आग विजविण्यासाठी अग्निशमन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. ही आग विजविण्यासाठी उड्डाण पुलावरील ठाणेहून घोडबंदरकडे जाणारा तसेच घोडबंदरहून ठाणेकडे येणारा असे दोन्ही मार्ग वाहतूकीसाठी अर्धातास बंद ठेवण्यात आला होता. तर पुलाखालील मार्ग मात्र वाहतूकीसाठी सुरू होता. या मार्गावरूनच पुलावरील वाहतूक वळविण्यात आली होती. यामुळे मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ही आग अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने तीन वाजताच्या सुमारास पूर्णपणे विजविली आहे. तसेच हा टँकर क्रेनच्या साहाय्याने पातलीपाडा उड्डाणपुलावरुन बाजूला करण्याचे काम शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने सुरू आहे. परंतू, या मार्गावर झालेल्या कोंडीचा फटका अंतर्गत मार्गावरील वाहतूकीला बसला.