निवडणुकीपूर्वी अट्टल गुन्हेगारांचा ‘बंदोबस्त’

ठाणे जिल्ह्यात पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमी  वर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील गुंडांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे.

अभिलेखावरील गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सुरुवात

किशोर कोकणे

ठाणे : ठाणे जिल्ह्यात पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमी  वर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील गुंडांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये  सहभाग असलेल्या गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली असून अट्टल गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी रणनीती आखली जात आहे.

 ठाणे जिल्ह्यात येत्या काही महिन्यांत महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. निवडणुकांचे पडघम वाजू लागताच भागातील गुंडांचा परिसरात वावर वाढू लागतो असा आजवरचा अनुभव आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सक्रिय राहिलेल्या आणि निवडणूक काळात राजरोसपणे वावरणाऱ्या गुंडांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. गंभीर  प्रकरणात दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या व जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांची माहिती पोलिसांकडून काढली जात आहे. ही माहिती गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना वर्ग करेल. निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुंडांना स्थानिक पोलीस ताब्यात घेण्यास सुरुवात करतील. तसेच त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

तडीपारांचाही शोध

निवडणुकांच्या पार्श्वभूमी  वर ठाणे, रायगड, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले गुंड ही छुप्या पद्धतीने पुन्हा जिल्ह्यात वास्तव्यास आल्याची शक्यता आहे. त्यामुळे या तडीपार गुंडांचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे पोलिसांनी ‘ऑल आऊट’ मोहिमेअंतर्गत १८ तडीपारांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pre election hardened criminals police ysh

ताज्या बातम्या