बदलापूरः बदलापुरात मंगळवारी झालेल्या पूर्व मोसमी पावसाने तासाभरात बदलापुरात दाणादाण उडवून दिली. एका तासाच्या पावसात तब्बल ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे बदलापूर पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसर, सर्वोदय नगर, पूर्वेतील कात्रप राज्यमार्गावर पाणी साचले. त्यामुळे वाहतूक कोंडी पहायला मिळाली. नालेसफाई न झाल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे दिसून आले.
यंदाच्या वर्षात मोसमी पावसाचा प्रवास लवकर सुरू झाल्याचे हवामान अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे. नुकतेच मोसमी पावसाने अंदमान बेटांपर्यंतचा प्रवास केला. त्यामुळे राज्यात पूर्व मोसमी अर्थात वळव्याच्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यात पश्चिम विक्षोभामुळे पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. तर मंगळवारी बदलापूर शहराला पूर्वमोसमी पावसाने झोडपले. दुपारच्या सुमारास गडगडाटासह जोरदार वारा सुटला. त्यानंतर काही मिनिटात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तासभर झालेला हा पाऊस अंबरनाथ शहराच्या वेशीपर्यंत कोसळला. मात्र अंबरनाथ, उल्हासनगर आणि आसपासच्या परिसरात पावसाचे वातावरण असताना सायंकाळी सहापर्यंत पाऊस पडला नाही. त्याचवेळी बदलापुरात मात्र पावसाने दाणादाण उडवून दिली.
बदलापूर शहरात मंगळवारी एका तासात तब्बल ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. पाऊस होत असताना सुटलेल्या वाऱ्याचा वेगळी ४५ किलोमीटर प्रतितास इतका होता. त्यामुळे पहिल्या पूर्वमोसमी पावसाचा रूद्रावतार पाहायला मिळाला. बदलापूर स्थानक परिसरात पावसात पाणी साचले होते. सर्वोदयनगर भागात पाणी साचल्याचे दिसून आले. नाल्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तसाच प्रकार बदलापूर पूर्वेतील कर्जत राज्यमार्गावरही पहायला मिळाला. येथे रस्त्याच्या दुभाजकांचे काम सुरू आहे. येथे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले. पाण्याचा निचरा झाला नसल्याने अंबरनाथकडे जाणाऱ्या मार्गिकेचा निम्म्याहून अधिक भाग व्यापला होता. त्यामुळे एकाच भागातून वाहने जात होती. परिणामी वाहतूक कोंडी झाली होती.
या भागातील नाल्यांमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनीच पाणी जाण्याच्या ठिकाणी अडकलेला कचरा, दगड काढण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र पहिल्याच पूर्व मोसमी पावसात शहरात कोंडी झाली होती.
आठवडाभर पावसाच्या सरी
ठाणे जिल्ह्यासह आसपासच्या भागात येत्या आठवडाभरात पूर्व मोसमी पावसाची हजेरी पाहायला मिळेल, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. एरवी मे महिन्याच्या अखेरीस येणारे पूर्व मोसमी पाऊस मेच्या दुसऱ्याच आठवड्यात कोसळला. त्यामुळे मोसमी पाऊसही लवकरच येण्याची आशा निर्माण झाल्याची माहितीही मोडक यांनी दिली आहे.