ठाणे – जलपर्णीपासून तयार करत असलेल्या वस्तूंना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. आपल्याकडे जलपर्णीचा कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, महिला पुढाकार घेऊन या कामाला उंचावर घेऊन जात आहेत. त्यामुळे भविष्यात महिलांचे जीवन सुखकर आणि संपन्न होईल याची खात्री आहे, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मांडले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील कल्यण तालुक्यातील वरप येथे नाविन्यपूर्ण निरुपयोगी जलपर्णीपासून उपयुक्त हस्तकला प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती प्रकल्प ‘वीड टू वेल्थ’ अजय बहुउद्देशीय संस्था यांच्या मदतीने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी भेट दिली. या वेळी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधण्यात आला. तसेच महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून त्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी बोलताना रोहन घुगे पुढे म्हणाले, जलपर्णी पासून समाजोपयोगी आणि संसार उपयोगी वस्तू बनविण्याची उत्तम कल्पना आहे. यामुळे महिलांना जगण्याचा मार्ग मिळाला आहे. त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी हा रोजगार अत्यंत महत्त्वाचा आहे.तर, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे म्हणाल्या, याआधी जलपर्णीविषयी अनेक उच्चस्तरीय बैठकांचे आयोजन झाले. परंतु, त्याचे पुढे काही घडले नाही. मात्र, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने आणि पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागला. या उपक्रमात महिलांचा वाढता सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद पाहून अत्यंत समाधान वाटते.
या उपक्रमामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून त्यांच्यात उद्योजकता विकसित होण्यास मदत होत आहे. हा प्रकल्प केवळ उपजीविकेचा नव्हे, तर स्वाभिमानाचा आणि सशक्तीकरणाचा मार्ग बनला आहे, असे मत जय शिवराय स्वयं सहायता समूहाचे (म्हारळ) वर्षां शिरसाठ यांनी व्यक्त केले.