लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात अनेक ठिकाणी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. ठाणे पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका कारवाईत भर लोकवस्तीमध्ये वेश्या व्यवसाय चालविले जात अल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने या प्रकरणात एका दलालाला अटक केली आहे. घरातील बेडरुममधून तो वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

ठाणे शहरातील घोडबंदर भाग असेल वा जुन्या ठाण्याची वस्ती. अनेक ठिकाणी वेश्या व्यवसायाचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नौपाडा जवळील तीन पेट्रोल पंप परिसरात तर एका मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात होता. त्यातच, आता अतिशय दाटीवाटीचा परिसर असलेल्या वर्तकनगर जवळील यशोधननगर भागात भर दाटीवाटीच्या वस्तमध्ये वेश्या व्यवसाय, चालविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारच दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी या भागात कारवाई केली. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना या भागात दत्ताराम सावंत (५८) हा व्यक्ती वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे (क्राईम ब्रांच) उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक वालगुडे, दीपक भोसले, पोलीस हवालदार किशोर पाटील, महिला पोलीस अमलदार हर्षदा थोरात, भाग्यश्री पाटील, किरण चांदेकर, चालक पोलीस शिपाई उदय घाडगे यांच्या पथकाने सापळा रचला. त्यांनी बनावट ग्राहक तयार करुन दत्ताराम सावंत याच्याशी संपर्क साधला. त्याने पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात महिला पुरवित असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या इमारतीत बनावट ग्राहकाच्या मदतीने छापा टाला. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दत्ताराम सावंत याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या घरामध्ये एका बेडरुममधून तो हा वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती पुढे आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दत्ताराम सावंत याच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात स्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (सिट अधिनियम पुननिर्मित) – ३,४,५ ; भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १४३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी दत्ताराम सावंत याच्या तावडीतून महिलेची सुटका केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.