पाणी चोरी रोखण्यासाठी खासगी रक्षक नेमणार
बारवी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या अवाढव्य जलवाहिन्यांतून पाणीचोरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात या चोरीचे गांभीर्य वाढले असून राजरोसपणे होणाऱ्या या पाणीचोरीवर नजर ठेवण्यासाठी महामंडळाने खासगी सुरक्षा रक्षक नेण्याचा निर्णय घेतला आहे.
बारवी धरणातून कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई परिसराला पाणीपुरवठा केला जातो. औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिन्या बारवी धरणाच्या पायथ्यापासून थेट अंबरनाथ, बदलापूर, नेवाळी नाका (मलंग रोड), खोणी गावाहून (विमानतळ जमीन) कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील काटई नाक्याजवळ आणण्यात आल्या आहेत. या नाक्याजवळ वाहिन्यांना वळण देऊन त्या लोढा हेवन वसाहतीवरून शिळफाटा चौकातून ठाणे, नवी मुंबई दिशेने वळविण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांमध्ये चोवीस तास पाणी भरून ठेवण्यात येते. त्यामुळे कपातीच्या वेळा संपताच पाणी पूर्ण दाबाने महापालिकांच्या जलकुंभांपर्यंत पोहचविले जाते. अंबरनाथपासून ते शिळफाटा या सुमारे १० किलोमीटरच्या पट्टय़ात या वाहिन्यांच्या आजूबाजूला हॉटेल, ढाबे, गाडय़ांचे सव्र्हिस सेंटर, कार्यशाळा, वीटभट्टय़ा, भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे जाळे पसरले आहे. यापैकी काही मंडळी जलवाहिन्यांना छिद्र पाडून त्याद्वारे आपल्या व्यवसायासाठी चोवीस तास पाणी वापरत असतात, असे औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले आहे. या पाणी वापरावर एमआयडीसीतील अधिकारी तसेच पोलिसांचे नियंत्रण नाही. या पाणी उपशाचे देयकही हे व्यावसायिक भरणा करीत नाहीत.
तीन महिन्यापूर्वी अंबरनाथ ते शिळफाटा रस्त्यालगत सुमारे दीडशे ते दोनशे बेकायदा जलवाहिन्या एमआयडीसी अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात तोडून टाकल्या होत्या. अधिकारी निघून गेल्यावर त्या पूर्ववत झाल्या. काटईजवळील कोळे गाव परिसरात अधिकाऱ्यांनी ४० बेकायदा नळ जोडण्या तोडल्या होत्या. एमआयडीसी अधिकाऱ्यांना निव्वळ बेकायदा जोडण्या तोडणे एवढेच काम नसते. सातत्याने कारवाई केली तरी व्यावसायिक नळ जोडणी घेण्याचे थांबणार नाहीत, हे एमआयडीसीतील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे यापुढील काळात जलवाहिन्यांच्या देखभालीसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे.

मुख्य जलवाहिन्यांवरील चोरीच्या नळ जोडण्यांबाबत तक्रारी केल्या की तेवढय़ापुरती कारवाई केली जाते. मागाहून पुन्हा पाणीचोरी सुरू होती. बेकायदा नळजोडण्या देणारी, घेणारी ही मोठी साखळी या भागात कार्यरत आहे. पाणी चोरांवर गुन्हे दाखल होत नसल्याने ते पाणी चोरीसाठी सरसावतात.
नेताजी पाटील, कोळेगाव

अंबरनाथ ते शिळफाटा या दरम्यानच्या एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिन्यांवर कारवाई करूनही चोरीच्या नळ जोडण्या स्थानिक व्यावसायिकांकडून घेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याला पायबंद घालण्यासाठी अंबरनाथ काटईमार्गे शिळफाटा चौक या सात किलोमीटरच्या परिसरातून गेलेल्या मुख्य जलवाहिन्यांची देखरेख खासगी सुरक्षा एजन्सीकडून करण्याचा प्रस्ताव एमआयडीसीने तयार केला आहे. येत्या दहा दिवसात सुरक्षा एजन्सीचे काम सुरू होणार आहे.
शंकर जगताप, कार्यकारी अभियंता एमआयडीसी, डोंबिवली