ठाणे – एका प्रकल्पाच्या कामावरुन ठाणे महापालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी केदार पाटील आणि रमेश आंब्रे यांच्यात वाद झाले होते. हा वाद आता टोकाला पोहोचला असून रमेश आंब्रे आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन केदार पाटील यांच्या घरी गेले होते. याकारणावरुन संतापलेल्या केदार पाटील यांच्या पत्नी उज्वला पाटील यांनी महिलांसह आंब्रे यांच्या हिरानंदानी मेडॉस येथील इमारती खाली जाऊन ठिय्या आंदोलन केले.

एका उद्यानाच्या प्रकल्पावरुन भाजपा नगरससेविका स्नेहा आंब्रे यांचे पती रमेश आंब्रे यांच्या वाद झाले होते. त्यांचा हा वाद विकोप्याला पोहोचला आहे. रमेश आंब्रे हे त्यांच्या काही काही कार्यकर्त्यांना घेऊन केदार पाटील यांच्या घरी गेले होते. परंतू, हे सर्वजण जबरस्तीने घरात शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केदार पाटील यांच्या पत्नी उज्वला पाटील यांनी केला आहे. या निषेधार्थ उज्वला पाटील यांनी रमेश आंब्रे राहत असलेल्या हिरानंदानी मेडॉस येथील इमारतीच्या खाली महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन केले.

यावेळी त्यांनी रमेश आंब्रे यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, समाज व्यवस्थेवर आणि न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी एका सृजनशील महाराष्ट्रामध्ये राहते. परंतू, याच्यामध्ये जर आमच्यासारखी समाजसेवा करणारी व्यक्ती सुरक्षित नसेल तर कस होईल ? आंब्रे यांचा केदार पाटील यांच्यासोबतचा वाद हा कार्यालयीन होता. तो वाद कार्यालयापुरताच मर्यादित ठेवायला पाहिजे होता.

परंतू तरी देखील आंब्रे हे रात्री ९.३० वाजताच्या सुमारास वीस ते पंचवीस जणांना घेऊन जबरदस्ती सोसायटीत शिरले. यातील काही लोक मद्यपान केलेले होते असा आरोप उज्वला यांनी केला आहे. या घटनेनंतर तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली, पोलिसांनी त्यांच्यावर अद्याप कारवाई केली नसल्याचे उज्वला यांनी सांगितले.