ठाणे : महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी डायघर येथील प्रकल्पाचे काम पुर्ण होईपर्यंत पालिका हद्दीबाहेर म्हणजेच भंडर्ली येथे तात्पुरता प्रकल्प प्रशासनाने उभारला असून, त्यापाठोपाठ आता उघड्यावरील कचरा आणि बायोमास जाळणे तसेच बांधकाम साहित्य कचऱ्यामुळे प्रदूषण करणाऱ्यांवर यापुढे स्वच्छ कृती आराखडा अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी कारवाईचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दिले आहेत. ५ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे. ठाणे शहर धूळ प्रदूषणापासून मुक्त रहावे यासाठी आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धधतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डायघर येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्यापासून वीज निर्मीतीचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाचे काम पुर्ण होईपर्यंत पालिका हद्दीबाहेर म्हणजेच भंडर्ली येथे तात्पुरता प्रकल्प प्रशासनाने उभारला आहे. याठिकाणी कचरा विल्हेवाटीचे काम सुरु झाल्याने पालिकेने दिवा कचराभुमीवर कचरा टाकणे बंद केले आहे. त्याचबरोबर स्वच्छ कृती आराखडा अंतर्गत पालिका प्रशासनाकडून शहरात धुळ आणि धूर प्रदुषण रोखण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येत असून त्यापाठोपाठ आता शहरात धुर आणि धूळ प्रदूषण करणाऱ्यांवर स्वच्छ कृती आराखडा अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. त्यासाठी त्यांनी नियमावली तयार करत या कारवाईचे अधिकार विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा : कल्याण डोंबिवली पालिकेतील बेशिस्त कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांचा दणका, दीडशे जणांना बजावल्या शिस्तभंगाच्या नोटीसा

नियमावलीनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळल्यास पाच हजार रुपये दंड आकरण्यात येणार असून ही कारवाई प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत करण्यात येणार आहे. तर, उघड्यावर कचरा जाळण्याचे कृत्य मोठे असेल तर, संबंधितांवर २५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून या कारवाईचे अधिकार घनकचरा व्यवस्थापन विभागाला असणार आहे. बांधकाम साहित्य कचऱ्याच्या विना आच्छादन वाहनाद्वारे वाहतूक करून धूळ प्रदूषण केले तर, ५ हजार रुपये दंड, बांधकाम साहित्य कचरा वाहनाद्वारे रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी, खाजगी जागेत अनधिकृतपणे टाकल्यामुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणासाठी प्रति टन ५ हजार रुपये आणि बांधकाम साहित्य कचऱ्यामुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणासाठी २५ हजार रुपये दंड वसुल करण्यात येणार आहे. या कारवाईचे आधिकार कर विभागाला देण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे शहर धूळ प्रदूषणापासून मुक्त रहावे यासाठी सर्व नागरिकांनी या नियमावलीचे पालन करावे व दंडात्मक कारवाई टाळावी. दंडात्मक कारवाईबाबत काटेकोर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. – मनिषा प्रधान ,मुख्य पर्यावरण अधिकारी, ठाणे महापालिका