कल्याण : मध्य रेल्वेच्या कल्याण- कसारा रेल्वे मार्गावरील आसनगाव रेल्वे स्थानकात कसारा दिशेने पूर्व पश्चिम भाग जोडणारा पादचारी पूल उभारणीच्या कामाला रेल्वे प्रशासनाने सुरूवात केली आहे. या कामामुळे रेल्वे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील सात ते आठ वर्षापूर्वी आसनगाव रेल्वे स्थानकातील कसारा दिशेकडील जुना पादचारी पूल तोडण्यात आल्यानंतर पूर्व बाजूकडे जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकात वळसा घेऊन पूर्व भागात जावे लागत होते.

कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शैलेश राऊत, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव, माजी अध्यक्ष जितेंद्र विशे यांनी रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून आसनगाव रेल्वे स्थानकात कसारा दिशेने पादचारी पूल उभारण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिले होती. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या होत्या.

आसनगाव रेल्वे स्थानकातील कसारा बाजूकडील जिन्यावरील रेल्वे तिकीट खिडकीजवळून हा पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. या पुलामुळे पूर्व भागातील प्रवाशांना आता धावपळ करत रेल्वे वाहनतळाजवळील कोंडीने अडकलेल्या रेल्वे जिन्याच्या भागात जाण्याची गरज लागणार नाही. आसनगाव पूर्व भागातील रेल्वे स्थानकाजवळील विहिरीजवळ या जिन्याची उभारणी होईल. आसनगाव रेल्वे स्थानकात पूर्वीपासून कसारा दिशेने पूर्व पश्चिम भाग जोडणारा जिना होता. आठ वर्षापूर्वी हा जिना नवीन पादचारी पुलाच्या उभारणीसाठी तोडण्यात आला. नवीन पादचारी पूल उभारणी करताना रेल्वे स्थानकात जिन्याची उभारणी करण्यात आली.

जिन्यावर रेल्वे तिकीट खि्डकी सुरू करण्यात आली. रेल्वे तिकीट खिडकी ते पश्चिम भागात उतरण्यासाठी जिन्याची मार्गिका तयार करण्यात आली. परंतु, रेल्वेने पूर्व भागात उतरण्यासाठी जिन्याला मार्गिका बांधली नाही. त्यामुळे आसनगाव रेल्वे स्थानकात कसारा दिशेने लोकलमधून उतरणाऱ्या तीन ते चार डब्यातील प्रवाशांना दक्षिण दिशेला पाठीमागे जाऊन तेथून जिन्याने किंवा सरकत्या जिन्याने पूर्व बाजूला उतरावे लागते. या रेल्वे स्थानकातील मधल्या भागाचे जिने ४० ते ५० पायऱ्यांचे आहेत. ज्येष्ठ, वृध्द नागरिकांबरोबर सामान्य प्रवाशांचीही हे जिने चढताना दमछाक होते. प्रवाशांची गैरसोय विचारात घेऊन लवकर पादचारी जिन्याची उभारणी करावी म्हणून कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटना, कल्याण कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी प्रयत्नशील होते. आसनगाव रेल्वे स्थानकातून शहापूर तालुक्यातील सुमारे ५० हून अधिक खेड्यांमधून नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त सुमारे एक लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

आसनगाव रेल्वे स्थानकात कसारा दिशेने उतरणाऱ्या तीन ते चार डब्यातील प्रवाशांची होणारी गैरसोय, याशिवाय पूर्व पश्चिम भागात जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय विचारात घेऊन आसनगाव रेल्वे स्थानकात कसारा दिशेने पादचारी पुलाची उभारणी करावी म्हणून आम्ही रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्ष प्रयत्नशील होतो. त्या प्रयत्नांना आता यश येऊन पादचारी पुलाचे काम सुरू झाले आहे.- शैलेश राऊत अध्यक्ष,कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटना.