कल्याण : कल्याण जवळील मलंग गड डोंगर रांगांमध्ये रविवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. पावसाचे हे पाणी मलंग गड परिसरातील नदी, नाले, ओहळांमधून पलावा, शिळफाटा, कल्याण बदलापूर रस्ता दिशेने वाहून आल्याने खोणी पलावा ते तळोजा रस्ता सोमवारी पाण्याखाली गेला. या रस्त्यावर काही ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीचा या रस्त्यावर खोळंबा झाला.
पहिल्याच पावसाने खोणी पलावा ते तळोजा रस्ता, काटई – बदलापूर रस्त्याचा काही भाग पाण्याखाली गेल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. कल्याण, डोंंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी परिसरातून दररोज खासगी वाहने, भाड्याच्या वाहनांनी पनवेल, तळोजा, पनवेल दिशेकडे अनेक प्रवासी प्रवास करतात. औद्योगिक क्षेत्रामुळे मालवाहू वाहनांची या भागातून वर्दळ असते. मुसळधार पाऊस पडत नसल्याने खोणी पलावा ते तळोजा रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत असेल असे वाटून नेहमीप्रमाणे प्रवासी या रस्त्याने सोमवारी गेले. पण या रस्त्यावर अनेक भागात पाणी साचल्याचे दिसले.
वाहन चालकांना अर्धा ते एक फुटाच्या पाण्यातून वाहने चालवावी लागली. वाहनाच्या इंजिनमध्ये पाणी घुसून वाहन बंद पडले तर पाण्यात अडकून पडायला नको म्हणून अनेक वाहन चालकांनी पाणी ओसरेपर्यंत वाहने रस्त्याच्या बाजुला उभी करून ठेवली. पाण्याचा प्रवाह अचानक वाढून वाहन वाहून गेले तर, अशीही भीती अनेक प्रवासी, वाहन चालकांमध्ये असल्याने त्यांनी झटपट या रस्त्यावरून माघार घेऊन पर्यायी रस्ते मार्गाने जाणे पसंत केले.
काही वाहन चालकांनी सोमवार कार्यालयाचा पहिला दिवस असल्याने रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याचा विचार न करता साचलेल्या पाण्यात वाहने घालून पलावा खोणी ते तळोजा दिशेने प्रवास केला. बदलापूर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी परिसरातील वाहन चालकांना या पहिल्याच पावसाच्या पाण्याचा फटका बसला. तळोजा खोणी रस्त्यावर काही ठिकाणी कामे सुरू आहेत. ही कामे अर्धवट असल्याने त्याचा फटका या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना बसतो. पावसाला दमदार सुरूवात होण्यापूर्वीच ही कामे पूर्ण करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
मालवाहू अवजड वाहनांची या रस्त्यावरून येजा असते. ही वाहने या रस्त्यावरील पाण्यातून संथगतीने चालवली जात होती. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. खोणी तळोजा रस्त्यावर वाहन कोंडी आणि पावसाचे पाणी तुंबल्याने अनेक वाहन चालकांनी काटई नाका, शिळफाटा पलावा चौक, कळंबोली, नावडे फाटा असा जाण्यासाठी आणि येण्यासाठी वापर केला.