ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि शिवसेना (उबाठा) उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या अलीकडील वाढत्या भेटीगाठींमुळे दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन भावांमधील सौहार्दाचे राजकीय संकेत मिळत असतानाच, ठाण्यातील रांगोळी प्रदर्शनातही या ऐक्याचे प्रतिबिंब पाहायला मिळाले.

ठाण्यातील कलाछंद रांगोळीकार मंडळ ठाणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भव्य रांगोळी प्रदर्शन २०२५’ मध्ये कलाकारांनी आपल्या सृजनातून दीपावलीचा आनंद आणि समाजातील एकतेचा संदेश रंगवला आहे. वर्तकनगर येथील ब्राम्हण विद्यालयात २० ते २६ ऑक्टोबरदरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असलेल्या या प्रदर्शनात ठाणेकरांना रंग, कल्पकता आणि कलात्मकतेचा संगम अनुभवायला मिळत आहे. गेल्या ३२ वर्षांपासून सातत्याने भरविले जाणारे हे प्रदर्शन आता ठाण्याच्या दिवाळीचा अविभाज्य भाग बनले आहे. यावर्षीचे प्रदर्शन “रंगांमधून एकता आणि संस्कृतीचे दर्शन” या भावनेला साजेसे ठरले आहे.

व्यक्तीचित्रांची रंगोळी साकारली

प्रदर्शनात विविध कलाकारांनी उल्लेखनीय कलाकृती सादर केल्या आहेत. सुभाष शाक्यवार यांनी अमरीश पुरी, नितीन कोळी यांनी ‘नाळ’ चित्रपट, योगेश भागणे यांनी ‘छावा’, बबन राणे यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली, मनोज सावंत यांनी संध्या शांताराम, प्रथमेश वाघमारे यांनी दशावतार, सुधाकर भोसले यांनी ‘जोकर’, मयंक थोरात यांनी सदगुरू महाराज, मृण्मयी कोळी यांनी ‘स्त्रीशक्ती – कॅन्डल लेडी’, तर हिंदवी तरे यांनी दि. बा. पाटील या व्यक्तीचित्रांची रंगोळी साकारली आहे.

भव्य कलासोहळा

रांगोळी ही भारतीय परंपरेतील शुभतेचे प्रतीक मानली जाते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील हे प्रदर्शन फक्त रंगांची मेजवानी नाही, तर कलावंतांच्या कल्पकतेचे, समर्पणाचे आणि सृजनशीलतेचे दर्शन घडवणारा एक भव्य कलासोहळा आहे. ठाणेकरांसाठी दिवाळीचा हा रंगोत्सव एक अद्वितीय कलानुभव ठरणार असून, या प्रदर्शनातून कलेचा आणि संस्कृतीचा प्रकाश अधिक उजळणार आहे, असे आयोजक मनसेचे संदीप पाचंगे यांनी सांगितले.

ठाकरे कुटुंबातील ऐक्याचा संदेश

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) उद्धव ठाकरे यांच्या अलीकडील वाढत्या भेटीगाठींमुळे दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच ठाण्यातील रंगोळी प्रदर्शनात ठाण्याचे रांगोळीकार उमेश सुतार यांनी बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या तिघांचे व्यक्तीचित्र साकारले आहे. या रांगोळीतून ठाकरे कुटुंबातील ऐक्याचा आणि मराठी अस्मितेच्या भावनेचा संदेश दिला गेला आहे.