शहरबात : थंड झालेली तोफ

मोठा गाजावाजा करून आयोजित करण्यात आलेल्या या सभेने कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले आहे.

राज ठाकरे यांच्या वसईतील जाहीर सभेत वसईतील ठाकूर यांच्या सत्तेवर मौन बाळगले.

 

राज ठाकरे यांच्या वसईतील जाहीर सभेत वसईतील ठाकूर यांच्या सत्तेवर मौन बाळगले. वसईतील एकही मुद्दा घेतला नाही. यामुळे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले. मोठा गाजावाजा करून आयोजित करण्यात आलेल्या या सभेने कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले आहे.

पक्षबांधणीच्या दौऱ्याची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी वसईतील एकमेव जाहीर सभेतून केली. १३ वर्षांनंतर वसईत आलेले राज ठाकरे जाहीर सभेत बोलणार असल्याने कमालीची उत्सुकता होती. वसईतील विविध समस्या, घोटाळे आदींबाबत तो बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र वसईतील सत्ताधारी हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात चकार शब्दही काढला नाही की वसईतील एकाही समस्येवर बोलले नाही. यामुळे वसईतील मनसे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले. ‘हितेंद्र ठाकूर हा छोटा विषय आहे,’ असे सांगून त्यांनी मौन बाळगल्याने हजारो मनसे कार्यकर्त्यांना कमालीचा धक्का बसला. यामुळे राज ठाकरे यांची सभा मनसे कार्यकर्त्यांची खच्चीकरण ठरणारी ठरली, असंच म्हणावं लागेल.

पाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी वसईतील भूमाफियांचा आणि गुजराती पाटय़ांचा मुद्दा उचलला होता. त्यानंतर मनसेने वसईत आंदोलन सुरू केले आणि लगेचच अध्यक्ष राज ठाकरे वसईत येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या वसईतील सभेविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. वसईतील मरगळ आलेल्या पक्षात नवचैतन्य संचारले होते. या सभेच्या आधी स्थानिक मनसे नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन वसईतील अनेक मुद्दे मांडले होते. त्यामुळे आता राज ठाकरेंना ऐकायची उत्सुकता होती. वसईत मनसे पक्षाचे अस्तित्व फार नाही. त्यामुळे वसई आणि पालघर जिल्ह्यात पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार होती. गेले महिनाभर कार्यकर्ते राब राब राबत होते. स्थानिक नेत्यांनी सभा यशस्वी करण्यासाठी जिवाचे रान केले, प्रचंड गर्दी जमवली पण पदरी निराशा पडली.

सभेपूर्वीच तर्क-वितर्काना उधाण आले होते. वसईतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडी पक्षाचा रंग पिवळा आहे. त्याच पिवळ्या रंगाच्या खुर्च्या या सभेत वापरल्या. त्यामुळे ‘सभा ठाकरेंची आहे की ठाकूरांची’ अशी चर्चा रंगली होती. राज ठाकरे यांनी ५५ मिनिटे भाषण केले. नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, भाजप, नोटाबंदी, आरक्षण आदी जुन्या विषयांना उजाळा दिला. बराच वेळ इतिहासातील कंटाळवाणे दाखले देत राहिले. भाषण संपत आले तरी वसईबद्दल काही उल्लेख होत नसल्याने कार्यकर्त्यांत चुळबुळ सुरू झाली. वसईत वर्षांनुवर्षे एकहाती सत्ता गाजविणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांबद्दल काहीच ठाकरे बोलत नसल्याने लोक अस्वस्थ झाले. शेवटी ठाकरे यांना चिठ्ठी पाठवावी लागली. तेव्हा ‘हितेंद्र ठाकूर हा माझ्यासाठी छोटा विषय आहे. त्यापेक्षा महाराष्ट्रावर जी संकटे आहेत ती महत्त्वाची वाटतात,’ असे सांगून त्यांनी भाषण संपवले. यामुळे प्रचंड नैराश्य पसरले. सभा संपल्यानंतर लोकांच्या बोलण्यातून ही नाराजी जाणवत होती.

सभेतून परतणारे लोक, तरुण अस्वस्थ झाले. वसईत येऊन वसईतील सत्ताधाऱ्यांवर चकार शब्दही न बोलल्याने निराश झाले होते. वसईतील मनसे कार्यकर्ते ज्या विरोधात लढतात ती व्यक्ती राज ठाकरे यांना ‘छोटा विषय’ वाटत होती. सभेनंतर समाजमाध्यमावर राज ठाकरे यांच्या ठाकूरांवरील मौनावर, हितेंद्र ठाकूर यांच्या असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधावर चर्चा रंगली होती. १३ वर्षांपूर्वीही राज ठाकरे निवडणूक प्रचारानिमित्त नालासोपारात आले होते, तेव्हाही ठाकूरांबद्दल काय बोलायचे, असे सांगून वेळ मारून नेली होती. राज ठाकरे पंतप्रधान, मुख्यमंत्री आदींवर टीका करू शकतात पण वसईतील आमदारावर चकार शब्दही बोलू शकत नाही ही वस्तुस्थिती पुन्हा अधोरेखित झाली.

जर जुन्या झालेल्या त्याच मुद्दय़ावर बोलायचे होते तर मग राज ठाकरे वसईत आलेच कशाला, असा सवाल उपस्थित झाला. सर्वच राजकीय पक्षाचे नेते वसईतील ठाकूर घराण्याशी घरगुती संबंध प्रस्थापित करून आहेत. म्हणून त्यांच्या विविध लग्न सोहळ्यात ही मंडळी येत असतात. सगळ्या राजकीय पक्षांचे नेते येतात पण वसईतील ठाकूरांबद्दल काहीच बोलत नाही. ती परंपरा राज ठाकरे यांनी कायम ठेवली. बाळासाहेब ठाकरे पण काहीच बोलले नव्हते. त्या वेळी ‘वाघाचा बोका झाला’ अशी खिल्ली उडवण्यात आली होती.

हिंतेद्र ठाकूर यांची वसई-विरारमध्ये मागील तीन दशकांपासून एकहाती सत्ता आहे. तीन आमदार आहेत. बहुमताने पालिकेतील सत्ता आहे. पण आज वसईत सारे काही आलबेल नाही. अनेक मूलभूत प्रश्न आ वासून आहेत. महापालिकेतील घोटाळे असोत, की प्रलंबित विकासकामे असोत. बोलण्यासारखे खूप होते. स्थानिक नेत्यांनी वसईतील विविध समस्यांची माहिती ठाकरे यांना यापूर्वीच दिली होती. त्यावर तर बोलले नाहीत पण किमान वसई-विरार महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकवू हे कार्यकर्त्यांना उभारी देणारे चार शब्दही बोलू शकले नाहीत. जो माणूस पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर टीका करून त्यांचे वाभाडे काढू शकतो, तो हितेंद्र ठाकूर यांच्यावर चार शब्दही बोलू शकत नाही, ही गोष्ट खटकणारी आणि पक्षातील हजारो कार्यकर्त्यांना नाउमेद करणारी आहे. ठाकरे यांची ठाकूर यांच्याशी मैत्री आहे. त्यामुळे वैयक्तिक टीका करण्याऐवजी धोरणात्मक टीका किंवा नाव न घेताही टीका करता आली असती. वसईच्या विकासाठी ब्लू प्रिंट मांडू शकले असते. पण असे काही झाले नाही. नेत्यानेच मौन बाळगल्याने आता वसईतील सत्ताधाऱ्यांविरोधात लढायचे कसे या विचाराने वसईतील मनसे कार्यकर्ते हतबल झाले आहेत. आमचा कारभार एवढा चांगला आहे की तुमच्या नेत्यालाही काही बोलता आले नाही, अशा शब्दात सत्ताधारी मनसे कार्यकर्त्यांची खिल्ली उडवीत आहेत. ते स्थानिक मनसे कार्यकर्त्यांना जास्त जिव्हारी लागणारे आहे.

मनसेने नालासोपारा विधानसभेच्या निवडणुकीत लक्षणीय मते मिळवली होती. मनसेच्या विचारसरणीला मानणारा मोठा मराठी वर्ग वसईत आहे. त्या वर्गाला आपलेसे करण्याची, पक्ष वाढवण्याची मोठी संधी होती. राज ठाकरे यांनी वसईतील मनसेला वाढविण्याची संधी वाया घालवली आहे. या मौनाचे दूरगामी परिणाम पक्षाला भोगावे लागणार आहेत.

@suhas_news

suhas.birhade@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raj thackeray speech in vasai demoralise mns workers

ताज्या बातम्या