ठाणे : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वापरण्यात आलेल्या ईव्हीएम यंत्रणांची तपासणी व पडताळणी सुरू झाली. त्यामध्ये ठाणे जिल्हा व यवतमाळ या दोन जिल्ह्यांची फेर तपासणी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा आणि ठाणे शहर विधानसभा या दोन मतदारसंघाची मशीनची फेर तपासणी करण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी तुर्भे स्टोअर नवी मुंबई येथे उपस्थित असताना ईव्हीएमची बीयू, सीयु, व्हीव्हीपॅटच्या तपासणी व पडताळणी दरम्यान फक्त मशीन चालू करून कोणाला किती मतदान झाले हे न दाखवता एकूण झालेले मतदान दाखवून मशीन बंद केल्या असा, आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते राजन विचारे यांनी केला आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्यात विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला होता. या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएम यंत्रणांच्या साहाय्याने महायुतीने महाराष्ट्रातील विजय मिळविला अशी टिका वारंवार केली होती. त्यानसार, ठाणे विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) उमेद्वार राजन विचारे यांनीही ईव्हीएम यंत्रणांबाबत संशय उपस्थित केला होता. ठाणे जिल्हा व यवतमाळ या दोन जिल्ह्यांची फेर तपासणी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा आणि ठाणे शहर विधानसभा या दोन मतदारसंघाची मशीनची फेर तपासणी करण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी तुर्भे स्टोअर नवी मुंबई येथे उपस्थित असताना ईव्हीएमची ‘बीयू, सीयु, व्हीव्हीपॅट’च्या तपासणी व पडताळणी दरम्यान फक्त मशीन चालू करून कोणाला किती मतदान झाले हे न दाखवता फक्त एकूण झालेले मतदान दाखवून मशीन बंद केल्या असा आरोप विचारे यांनी केला आहे.
तसेच ही प्रक्रिया करताना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक निकालानंतर बॅटरी काढून घेतल्या जातात. परंतु या तपासणी व पडताळणी दरम्यान यामध्ये बॅटरी आढळून आल्या तसेच या मशीन तीन सत्रामध्ये चालू असलेल्या दिसायला पाहिजे. त्या चार सत्रामध्ये चालू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ज्या मतदान केंद्रावरून अधिक मतदान मिळण्याची अपेक्षा होती. त्याच मशीनच्या प्रक्रियेमध्ये तफावत असल्याचे आढळून आल्याने या मतदान केंद्रावरील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या कागदपत्रांची तसेच सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची मागणी विचारे यांनी केली आहे.