ठाणे – ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, या निर्णयाने अनेकांच्या पोटात दुखत आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) चे माजी खासदार राजन विचारे यांनी केली. ते श्रावण सोमवारनिमित्त ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरात दर्शनानंतर माध्यमांशी बोलत होते. “ठाकरे बंधू हे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. ब्रँड कधीच संपू शकत नाहीत, ते रक्ताचे नाते आहे. त्यांच्या एकत्र येण्याने अनेकांच्या पोटात दुखत आहे. ती पोटदुखी लवकरच बरी व्हावी,” असा टोलाही त्यांनी शिंदे गट व भाजपावर लगावला.
श्रावण सोमवार – कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्यामुळे ठाणे जिल्ह्याचे ग्रामदैवत कौपिनेश्वर मंदिरात पहाटेपासूनच मोठ्या संख्येने शिवभक्त दर्शनासाठी दाखल झाले होते. सुमारे ६३५ वर्षांपूर्वी बांधले गेलेले हे ऐतिहासिक शिवमंदिर आजही ठाणेकरांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. या निमित्ताने खासदार राजन विचारे यांनी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
– राज्यात भ्रष्टाचाराची मालिका सुरू विचारे यांचा आरोप
“राज्यात भ्रष्टाचाराची मालिका सुरू आहे. ठेकेदार आत्महत्या करत आहेत. शेतकरी आणि सामान्य जनता त्रस्त आहे. सरकारमधीलच मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे ३,००० कोटींचा घोटाळा उघड झाला. तरीही ठाण्यातील रस्त्यांची अवस्था, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.” राजकारण सध्या पक्षांतर, कार्यकर्त्यांना फोडणे आणि पैसे वाटप यावर केंद्रित असल्याचा आरोप करत, “भ्रष्टाचार करणारे एकत्र येऊन काम करत आहेत,” असेही ते म्हणाले.
– त्रिनेत्री शंकर भगवानाकडे प्रार्थना
शिवमंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रासाठी प्रार्थना केली की, “त्रिनेत्री शंकर भगवानांनी आपले नेत्र उघडून राज्यावरील संकटांवर बंदी घालावी. शेतकऱ्यांचे जीवन सुखी होवो आणि देशात चांगले दिवस यावेत,” अशी मनोकामना व्यक्त केली.
– मंत्रीमंडळावरही टीका
“आज संपूर्ण मंत्रिमंडळात केवळ देवेंद्र फडणवीस उरतील, उर्वरित सर्व मंत्र्यांना घरी बसावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
– ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
गेल्या काही आठवड्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा होती. अखेर ५ जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधी शासन निर्णय रद्द झाल्यानंतर दोन्ही बंधू २० वर्षांनंतर एकत्र आले. त्यानंतर मिरा भाईंदरमधील सभेत मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, त्यामुळे ठाकरे बंधूंचा युतीबाबतचा सूर अधिकच स्पष्ट झाला आहे.