पुर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि ठाण्यातील आपल्या शाखा काबीज करण्याचे काम या मंडळींने केले. शिवसेनेसाठी वर्षानुवर्षे राबलेल्या महिला आघाडीतील एका कार्यकर्तीचे झुणका भाकर केंद्र होते. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ते तिला दिले होते. ती उद्धव ठाकरेंची साथ सोडत नाही हे पाहून हे झुणका भाकर केंद्र या मंडळींनी पाडायला लावले. पालांडे नावाचे माजी सैनिक असलेल्या एका माजी नगरसेवकाच्या मुलाच्या सोनोग्राफी केंद्राला नोटीस बजावली. इतका अन्याय सहन करुनही आपण लढत राहीलो. अन्याय सहन केलात आता पेटून उठा त्यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असे भावनिक आवाहन ठाणे लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यातील सावरकरनगर भागात प्रचाराचा शुभारंभ करताना केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> कल्याण लोकसभेतील तुल्यबळ लढतीत आम्ही लढणार आणि जिंकणार पण, उबाठा पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा विश्वास

ठाण्यातील कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावरकरनगर, लोकमान्यनगर भागात महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना विचारे यांनी उपस्थितांना आणि विशेषत: पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिघे साहेबांचे आशिर्वाद आपल्या मागे आहेत, निर्धास्त रहा असे भावनिक आवाहन केले. ज्या महिलेला उदरनिर्वाहासाठी दिघे साहेबांनी झुणका भाकर केंद्र देऊ केले, ती महिला तुमच्या गटात सहभागी होत नाही म्हणून एका रात्रीत तिचे केंद्र पाडले. पालांडे नावाचे पंच्चाहत्तरी गाठलेले माजी नगरसेवक आहेत. माजी सैनिक म्हणून या व्यक्तीला ठाण्यातील राजकीय वर्तुळात आदराचे स्थान आहे. या वयात पक्ष कसा सोडायचा या विवंचनेत असल्याने ते आहेत तेथेच राहू या भूमीकेत होते. त्यांच्या मुलाचे सोनोग्राफी केंद्र आहे. जागा भाड्याने घेऊन त्यांच्या डाॅक्टर मुलाने ते सुरु केले होते. या केंद्राला नोटीस बजावून त्यांना धमकाविण्यात आले. दिघे साहेबांच्या काळात मोठया प्रयत्नांनी उभ्या केलेल्या एकएक शाखा यांनी बळजबरीने ताब्यात घेतल्या. पोलिस, प्रशासन, दादागिरीच्या जोरावर हम करे सो कायदा असा सगळा कारभार होता. ठाण्यात ठाकरेंना मानणारे शिल्लक ठेवायचे नाहीत अशाच पद्धतीचे काम सुरु होते. तरीही आपण उभे राहीलो, लढलो. जुन्या शाखा गेल्या खिशातील पैसे टाकून वस्त्यावस्त्यांमधून नव्या शाखा उभ्या केल्या. सगळच पैशाने विकत घेता येत नाही, निष्ठा नावाची काही चिज असते की नाही, असा घणाघात विचारे यांनी यावेळी केला.

हेही वाचा >>> वैशाली दरेकर : उत्तम वक्त्या आणि आक्रमक चेहरा, कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून महिला उमेदवार रिंगणात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य आणि ठाणे ओरबडले जातय यावेळी बोलताना विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता सरकार आणि महापालिकेच्या कारभारावर टिका केली. आज ठाणे महापालिकेची अवस्था पहा. गेल्या काही दिवसांपासून येथील कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे शिल्लक नाहीत. आपले सरकार आहे किती काळ टिकेल माहीत नाही. त्यामुळे लुटा आणि ओरबाडून घ्या असा कारभार ठाणे महापालिकेत आणि राज्य सरकारमध्ये सुरु आहे. सर्वसामान्य माणसाला हे दिसत नाही असे तुम्हाला वाटत असेल. परंतु त्याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल, अशी टिका विचारे यांनी केली. ही शेवटची लढाई आहे असे समजा. परंतु एकत्र या. लोकांना समजावून सांगा, आमचा पराभव झाला तर तो निष्ठेचा, न्यायाचा पराभव असेल. इतके दिवस अन्याय सहन केलात आता लढायला तयार व्हा, असे आवाहन यावेळी विचारे यांनी केले.