ठाणे : ठाण्यातील आनंदनगर, साकेत, गायमुख, फाउंटन हॉटेल असा उन्नत रस्ता उभारून तो मुंबईच्या पूर्व मुक्त मार्गाला जोडण्यात येणार आहे. तसेच टिकुजीनीवाडी ते बोरिवली असा भुयारी मार्ग बांधला जात असून, या मार्गामुळे भविष्यात केवळ दहा ते पंधरा मिनिटांत हे अंतर पार करता येईल. सध्या मीरा-भाईंदर ते बोरिवली यासाठी दोन ते अडीच तास लागतात. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि ठाण्याचा विकास अधिक गती घेईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राजमाता जिजाऊ उद्यान ‘ऑक्सीजन पार्क’चे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. त्यानंतर ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील जय भवानी नगर येथे नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वर्गीय आनंद दिघे उद्यानाचे लोकार्पण देखील करण्यात आले. कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपस्थित त्यांनी संवाद साधला.

नागरिकांची कोंडीतून सुटका करा

ठाणे शहर बदलतेय, डिसेंबरपर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होईल. रस्ते रुंद होत आहेत, रिंग मेट्रोचे काम सुरू झाले आहे. मुक्त मार्ग, भुयारी मार्ग या प्रकल्पांमुळे विकसित ठाणे, हरित ठाणे अशी शहराची ओळख निर्माण होत आहे, असे शिंदे म्हणाले. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी आयुक्तांना केल्या. पावसाळा संपल्यामुळे रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत, ती लवकर पूर्ण करून नागरिकांची कोंडीतून सुटका करा, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

प्राणवायू पार्क तयार करा

ठाण्यात कावेसर, लोकमान्य नगर, नागला बंदर आदी ठिकाणी अर्बन फॉरेस्ट निर्माण करण्यात आले आहे. ठाण्याचा झपाट्याने विकास होत आहे. चांगले अधिकारी मिळाले तर जिल्ह्याचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. मोठ्या शहरांत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आवश्यक आहे. मी आयुक्तांना एक लाख झाडे लावण्याची सूचना केली होती, त्यांनी तब्बल एक लाख पंचवीस हजार झाडे लावली. यावर्षी दोन लाख झाडे लावण्याचे सुचविले असता त्यांनी दोन लाख नऊ हजार झाडे लावली आहेत. त्यामुळेच ठाणे वरून पाहताना हिरवेगार दिसते आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्याचबरोबर, आणखी प्राणवायू पार्क तयार करावीत. तसेच, महापालिकेच्या शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्याने दोन झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, अशी सूचनाही शिंदे यांनी केली. मुंब्राच्या टेकडीवरील झाडांची वाढ आणि त्यांचा ‘वाढदिवस’ साजरा करणाऱ्या नागरिकांचा उल्लेख करताना त्यांनी पर्यावरणप्रेमी समाजाचे कौतुक केले.

रत्नागिरी विमानतळाच्या बांधकामातही बांबूचा वापर

प्राणवायू पार्क येथे औषधी वनस्पती, भरपूर ऑक्सिजन आणि गारवा आहे. फिरण्यासाठी ५०० मीटरचा ट्रॅक तयार केला आहे. येथे फिरल्याने बरेच आजार दूर होतील. पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केली असून, काही लोकांवर ‘बांबू लावण्याचे’ काम योग्य रीतीने होईल,” असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. बांबू उद्योगाला सरकारने उद्योगाचा दर्जा दिला आहे. राज्यभरात बांबू लागवडीसाठी सबसिडी दिली जाते. बंगळुरू विमानतळाप्रमाणे रत्नागिरी विमानतळाच्या बांधकामातही बांबूचा वापर केला जाणार आहे, असे शिंदे म्हणाले. साताऱ्यात गटशेतीद्वारे बांबू लागवड आणि प्रोसेसिंग सुरू करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना १०१ दूध देणाऱ्या गायी देण्याचा निर्णय

विदर्भ, मराठवाड्यातील पूरस्थिती हे हवामान बदलाचे द्योतक आहे. त्या भागातील शेतकऱ्यांना मदतीसाठी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून, आतापर्यंत साडेतीन ते चार हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. पुरात पशुधनाची हानी झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०१ दूध देणाऱ्या गायी देण्याचा निर्णयही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.