ठाणेः राज्य सरकारने स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तीन वर्षे उलटूनही याबाबतची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे या निर्णयाची तातडीने पूर्तता करावी आणि दि. बा. पाटील यांच्या कार्याला मानवंदना द्यावी, अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात केली. या मागणीनंतर मनसेचे माजी आमदार यांनी खासदार म्हात्रे यांच्या मागणीवरून राज्य सरकारवर टीका केली.
सत्ताधारी सराकर फक्त नवी मुंबई विमानतळासाठी हजारो कोटींचे ठेके आपल्याच लोकांना वाटण्यात व्यस्त आहेत व आमचे स्थानिक नेते ते घेण्यात व्यस्त आहेत, अशी खरमरीत टीका राजू पाटील यांनी केली आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळासाठी हजारो कोटींचे ठेके कुणासाठी अशी चर्चा रंगली आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीपासूनच या विमानतळाला स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होते आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे. आता नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या विमानतळावरून उड्डाण होण्याची आशा आहे. असे असताना या विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न प्रलंबित असल्याने स्थानिक भूमिपुत्र नाराज आहेत.
सातत्याने मागणी करू नये नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले जात नसल्याने आगरी समाज अस्वस्थ आहे. जून महिन्यात आगरी समाजाचे नेते आणि लोकप्रतिनिधींनी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
हाच मुद्दा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ मामा म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. दोन वेळा खासदार, पाच वेळा आमदार, विरोधी पक्षनेते राहिलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे अशी मागणी आहे. स्त्री भ्रुण हत्या विरोधी कायदा करण्यात पाटील यांचा.महत्वाचा वाटा होता. यासह भूमिपुत्रांच्या आंदोलनात दि.बा. पाटील होते. २०१३ भूमी अधिग्रहण कायद्यातही त्यांची भूमिका स्वीकारली गेली. त्यामुळे त्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याच्या निर्णयाची पूर्तता करावी अशी मागणी खासदार म्हात्रे यांनी केले.
या मागणीनंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी खासदार म्हात्रे यांचे समाज माध्यमांतून आभार मानले. मात्र त्याचवेळी राजू पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सत्ताधारी सरकार फक्त नवी मुंबई विमानतळासाठी हजारो कोटींचे ठेके आपल्याच लोकांना वाटण्यात व्यस्त आहेत व आमचे स्थानिक नेते ते घेण्यात व्यस्त आहेत. पण या भूमीसाठी लढणाऱ्या लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील साहेब यांचे नाव या विमानतळाला द्यावं, अशी मागणी झाल्यावर आतापर्यंत या सरकारने केवळ गुलाबी आश्वासने देत वेळकाढूपणा केला किंबहुना त्यांना विसर पडला आहे, अशी टीका पाटील यांनी पोस्टद्वारे केली. दि . बा. पाटील यांच्या नामांतरावरून राजू पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केल्याची चर्चा रंगली आहे.
यापूर्वीही कल्याण लोकसभा मतदारसंघातील रस्ते, पलावा उड्डाणपूल आणि 27 गावांच्या मुद्द्यांवरून पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले होते. आता विमानतळाच्या हजार कोटींच्या कंत्राटांवरून पाटील यांनी शिंदे यांना लक्ष केल्याची चर्चा रंगली आहे.