ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील वाॅर्डांचे नुतनीकरणाचे काम करताना, त्याठिकाणी प्राणवायू (ऑक्सिजन) वाहिनी बसविण्याच्या कामाची निविदाच काढलेली नसल्याची बाब पुढे आली होती. यावरून टिका होऊ लागताच पालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याबरोबरच कळवा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांची बदली करून त्यांच्या जागी डॉ. स्वप्नाली कदम यांची नियुक्ती केली आहे. तर, वैद्यकीय अधिक्षक डाॅ. अनिरुद्ध माळगावकर यांचीही बदली करण्याची तयारी पालिकेमार्फत सुरू आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. सुमारे पाचशे खाटांचे हे रुग्णालय असून येथे ठाणे शहर तसेच आसपासच्या शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयातील प्रसुती गृहात क्षमतेपेक्षा जास्त महिलांना ठेवण्यात आले असून यामुळे आरोग्य विभागातून प्रसतीसाठी पाठविण्यात येणाऱ्या महिलांना कळवा रुग्णालय प्रशासन मुंबई तसेच जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येत होते. आरोग्य केंद्र आणि रुग्णालय प्रशासनाचा समन्वय नसल्यामुळे महिलांचे हाल होत होते. यावरून पालिका प्रशासनावर टिका होत असतानाच, रुग्णालयातील प्राणवायु वाहीनीचे प्रकरण पुढे आल्याने प्रशासन अडचणीत आले होते.
कळवा रुगणालय रुग्ण सेवेसाठी अपुरे पडू लागल्याने त्यातील खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. यासाठी रुग्णालयातील विविध विभागांचे टप्प्याटप्प्याने नुतनीकरणाचे काम करण्यात येत आहे. परंतु या कामातील हलगर्जीपणा समोर आला होता. रुग्णालयातील वाॅर्डांचे नुतनीकरणाचे काम करताना, त्याठिकाणी प्राणवायू (ऑक्सिजन) वाहिनी बसविण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असला तरी, त्याची निविदाच अद्याप काढलेली नाही. या नियोजन शुन्य कारभारामुळे दुरुस्तीचे काम लांबणीवर पडल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ मध्ये प्रसिद्ध होताच, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी कळवा रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते.
नव्या अधिष्ठातांची नियुक्ती
पालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याबरोबरच राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांची तडकाफडकी बदली केली आहे. यामुळे रिक्त झालेला अधिष्ठाता पदाची जबाबदारी डॉ. स्वप्नाली कदम यांच्यावर सोपवली आहे. तसे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी काढले आहेत. डॉ. स्वप्नाली या शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आहेत.
