ठाणे – लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत संवादातील बदलापासून ते संगीत नियोजनातील बदल सहज आणि सोप्या पद्धतीने स्पष्ट करुन परिक्षक सांगत असल्यामुळे पुढील स्पर्धेसाठी अधिक जोमाने तयारी करण्यास प्रोत्साहन मिळते. यामुळेच लोकसत्ता लोकांकिका ही स्पर्धा इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते, अशी प्रतिक्रिया प्राथमिक फेरीतून ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या महाविद्यालयातील रंगकर्मी विद्यार्थ्यांनी दिली.

रंगकर्मी विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची ठाणे विभागीय प्राथमिक फेरी शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस पार पडली. या स्पर्धेत विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या एकांकिका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सादर केल्या. एकांकिका सादरीकरणानंतर परीक्षकांडून दहा ते पंधरा मिनिटे विद्यार्थ्यांना त्यांच्या एकांकिकेतील त्रुटींबरोबरच काय बदल करायला हवेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या प्राथमिक फेरीतून ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी पाच महाविद्यालयांची निवड करण्यात आली. त्यामध्ये ठाणे शहरातील ज्ञानसाधना, जोशी-बेडेकर, एनकेटी महाविद्यालये तर, पनवेलमधील सीके ठाकूर आणि उल्हासनगरमधील एसएसटी महाविद्यालयांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> ठाणे : दुचाकीचे नुकसान झाल्याने श्वानाच्या पायावर फरशी टाकली

या पाच महाविद्यालयांमध्ये ठाणे विभागीय अंतिम फेरीतून महाअंतिम फेरीत दाखल होण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत वेळेचे महत्व, भाषेची शुद्धता, वैचारिक पातळी, त्यासह कलेचे सादरीकरण अशा सर्वच गोष्टींचे उत्तम ज्ञान मिळते. त्यामुळेच राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धामध्ये ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा मानाची मानली जाते, अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली. ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘कुक्कुर’ या एकांकिकेत श्रीपादचे पात्र साकारणारा शुभम वेले ची ही पहिलीच मुख्य पात्र साकारणारी एकांकिका आहे. आधी लहान पात्र साकारायचो, तेव्हा काही वाटायचे नाही. मुख्य पात्र साकरणे ही मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी परिपूर्णपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करतोय, असे शुभम म्हणाला. तर, लोकसत्ता लोकांकिका राज्यस्तरीय स्पर्धा असल्यामुळे विविध विषय समजतात, यातून खूप काही शिकण्यास मिळते, असेही शुभमने सांगितले. जोशी -बेडेकर महाविद्यालयाची ‘क्रॅक्स इन द मिरर’ या एकांकिकेत मुख्य पात्र साकारणारी रुचिता सावंत हिचे या स्पर्धेत सहभागी होण्याचे पहिलेच वर्षे आहे.

हेही वाचा >>> मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसत्ता लोकांकिकाच्या प्राथमिक फेरीसाठीचे आयोजन अतिशय उत्तम होते. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या स्पर्धेत परिक्षकांचे आम्हाला चांगले मार्गदर्शन लाभले. त्यामुळे विभागीय अंतिम फेरीसाठी आणखी चांगल्या पद्धतीने आम्ही तयारी करत असल्याची प्रतिक्रिया रुचिता सावंतनी दिली. गेल्या वर्षापासून लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत एनकेटी महाविद्यालय सहभागी होत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही आमची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या विभागीय अंतिम फेरीसाठी तयारी करताना, प्राथमिक फेरीत झालेल्या चुका सुधारण्यासह त्यात कोणते बदल केले पाहिजे याचे उत्तम मार्गदर्शन परिक्षकांकडून आम्हाला मिळाले, अशी प्रतिक्रिया एनकेटी महाविद्यालयाची ‘रेशन कार्ड’ या एकांकिकेत वडिलांची भूमिका साकारणाऱ्या करण परदेशी याने दिली. तसेच लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत संवादातील बदलापासून ते संगीत नियोजनातील बदल सहज आणि सोप्या पद्धतीने स्पष्ट करुन परिक्षक सांगत असल्यामुळे पुढील स्पर्धेसाठी अधिक जोमाने तयारी करण्यास प्रोत्साहन मिळते. यामुळेच लोकसत्ता लोकांकिका ही स्पर्धा इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते, असे एसएसटी महाविद्यालयाचा विद्यार्थी जितेश म्हात्रे याने सांगितले.