ठाणे : ठाणे शहरातील सर्वाधिक इमारती उभ्या राहणाऱ्या घोडबंदर भागाचा प्रवास जीवघेणा कसा ठरतो आहे, याचे चित्रीकरण नुकतेच समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते. या व्हिडीओमध्ये एक वाहन चालक भरधाव आणि बेदरकारपणे वाहन चालविताना दिसत असून त्याने एका दुचाकीला देखील धडक दिली होती. या अपघातानंतर अखेर वाहन चालकाविरोधात पोलिसांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इम्रान रशिद मोहम्मद (२४) याच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.
घोडबंदर हा भाग ठाण्यातील सर्वाधिक वेगाने नागरिकरण होणारा भाग आहे. नागरिकरण वाढले असले तरी येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यामध्ये जोडणी अशा प्रकल्पांमुळे ठिकठिकाणी खोदकामे झाली असून येथील रस्ते अरुंद झाले आहेत. वाहनांची वर्दळ वाढत असताना खड्डे आणि वाहतुक कोंडीमुळे नागरिक बेजार झाले आहेत. नुकतेच समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या एका व्हिडीओने या घोडबंदरच्या वाहतुकीचे भीषण चित्र उघड केले होते. त्या व्हिडीओमध्ये घोडबंदर रस्त्यावरून एक वाहन भरधाव वेगाने धावताना दिसते आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसते. सगळ्यात धक्कादायक म्हणजे अपघात घडताच कारचालकाने वाहन थांबवण्याऐवजी थेट पळ काढला. काही सेकंदांच्या चित्रीकरणानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
नेमके व्हिडीओत काय आहे?
या व्हिडीओमध्ये एक भरधाव वाहन जात आहे. पातलीपाडा भागात हे भरधाव वाहन आल्यानंतर त्याने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी काही अंतर पुढे गेली. तर वाहन चालक रस्त्यावर पडला. अपघात केल्यानंतर त्या वाहन चालकाने आणखी वेगाने वाहन चालविले. या घटनेचे व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठ्याप्रमाणात प्रसारित होत आहे. तसेच समाजमाध्यमावरही संताप व्यक्त केला जात आहे.
घोडबंदर भागाचा प्रवास जीवघेणा कसा ठरतो आहे एक वाहन चालक भरधाव आणि बेदरकारपणे वाहन चालविताना दिसत असून त्याने एका दुचाकीला देखील धडक दिलीhttps://t.co/2jrmCKw8Ui#Thane #Thanenews pic.twitter.com/3Zslojy22w
— LoksattaLive (@LoksattaLive) November 5, 2025
पोलिसांकडून गुन्हा दाखल या घटनेचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेऊन गुन्हा दाखल केला आहे. वाहतुक पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा अपघात पातलीपाडा येथून वाघबीळच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर झाला. कॅश मॅनेजमेंट सर्विसेसचे वाहन असून इम्रान रशिद मोहम्मद हे वाहन चालवित होता. संबंधित वाहनाचा क्रमांक मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये इम्रान याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
