ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीला शिस्त यावी आणि प्रवाशांना वेळेत रिक्षा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उभारण्यात आलेल्या सॅटीस पुलाखाली रिक्षा चालकांची पुन्हा एकदा बेशिस्ती निर्माण झाली आहे. काही रिक्षा चालक बेशिस्त पद्धतीने कुठेही रिक्षा उभ्या करुन प्रवाशांना हेरत आहेत. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार ठाणे वाहतुक पोलिसांच्या चौकीसमोर होतो. या रिक्षा चालकांकडून रिक्षा देखील रांगेबाहेर विचित्र पद्धतीने उभ्या केल्या जातात. त्यामुळे या रिक्षा चालकांना केव्हा आवर बसेल असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून लाखो प्रवासी ये-जा करतात. येथील वाहतुक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी ठाणे महापालिकेने स्थानकाच्या पश्चिमेस सॅटीस पूल उभारला आहे. यातील सॅटीस पूलावरून टीएमटी बसगाड्यांची वाहतुक होते. तर सॅटीस पूलाखालील भागात मीटरच्या रिक्षांसाठी आणि प्रवाशांसाठी रांगांचे नियोजन करण्यात आले आहे. टीएमटीच्या बसगाड्यांची संख्या प्रवाशांच्या तुलनेत पुरेशी नसल्याने अनेकजण मीटरच्या रिक्षाने प्रवास करण्यास प्राधान्य देतात.
ठाणे वाहतुक पोलिसांनी येथील नियोजनासाठी एक पोलीस चौकी देखील उभारली आहे. या पोलीस चौकीमध्ये अधिकारी आणि इतर कर्मचारी तैनात असतात. असे असतानाही काही रिक्षा चालक रिक्षा रांगांचे नियम मोडून बेशिस्त पद्धतीने त्यांच्या रिक्षा कुठेही उभ्या करतात. त्यानंतर रिक्षा चालक हे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांना कुठे जाणार याबाबत विचारत त्यांना त्रास देताना दिसतात. रिक्षा चालक प्रवाशांच्या वाटेत देखील उभे राहतात. हा सर्व प्रकार पोलीस चौकीसमोर घडत असतानाही पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दररोज काही मुजोर रिक्षा चालकांकडून हा प्रकार केला जातो. या रिक्षा देखील कोठेही उभ्या केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना चालण्यास देखील अडचणी होतात. – विजय गायकवाड, प्रवासी.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात आमची कारवाई सातत्याने सुरु असते. यापुढीही कारवाई सुरु राहील असे ठाणेनगर वाहतुक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहीणी सोनार यांनी सांगितले.
