कल्याण : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कल्याण डोंबिवली पालिकेतील वैद्यकीय आरोग्य विभागातील शहर लेखा व्यवस्थापक रितेश रमाकांत जाधव यांच्या प्रशासकीय कामाचे कार्यमूल्यांकन करून, मगच त्यांना पालिकेतील कामासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी सक्त सूचना आयुक्त अभिनव गोयल यांनी अतिरिक्त आयुक्त, वैद्यकीय विभाग प्रमुखांना गेल्या जुलैमध्ये केली होती. हा महत्वपूर्ण प्रस्ताव आरोग्य अभियानाचे लेखा व्यवस्थापक रितेश जाधव यांंनी आरोग्य विभागाच्या प्रमुखांपासून दडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.

आयुक्त गोयल यांनी दिलेल्या आदेशापासून ते त्यानंतरच्या काळात रितेश जाधव यांनी त्यांच्या कार्यमूल्यांकनाचा प्रस्ताव आपल्यापासून दडवून ठेवला. त्यामुळे दरम्यानच्या काळात त्यांच्या कार्यमूल्यांकन अहवालाविषयी आपणास काही करता आले नाही. ही बाब कल्याण डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल यांनी मुंबईतील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे साहाय्यक संचालक यांना एका लेखी पत्राद्वारे निदर्शनास आणले आहे.

मुंबईतील राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागातून विश्वसनीय वरिष्ठ सुत्रांकडून ही माहिती समजली.मागील १२ वर्षापासून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून रितेश जाधव कल्याण डोंबिवली पालिकेत कंत्राटी पध्दतीने दरमहा २२ हजार ८८० रूपये मानधनावर नोकरी करत आहेत. या नोकरीच्या कालावधीत लेखा व्यवस्थापक जाधव यांनी प्रशासकीय कामात अनेक कारनामे आणि गडबडी करून ठेवल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे दाखल आहेत. आयुक्त अभिनव गोयल यांनी पाच महिन्यापूर्वी आरोग्य विभागाच्या बैठकीत रितेश जाधव यांच्या प्रशासकीय कामाविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. शहर लेखा व्यवस्थापक रितेश जाधव यांचे आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत असलेले काम असमाधानकारक असल्याने त्यांना तीन महिन्यांसाठी मुदतवाढ द्यावी. या तीन महिन्यातील त्यांच्या कामातील सुधारणा पाहून मगच त्यांच्या पुनर्नियुक्तीचा विचार करावा, अशा आयुक्तांच्या स्पष्ट सूचना आहेत.

आयुक्तांच्या निर्देशानुसार त्यांच्या मुदतवाढीच्या काळातील त्यांचा कार्यमूल्यांकन अहवाल वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी तयार करणे आवश्यक होते. पण, हा महत्वपूर्ण विषय जाधव यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणला नाही. त्यामुळे शासनास त्यांच्या मुदतवाढीबाबत कळविणे पालिकेला शक्य झाले नाही. जाधव यांची मुदत सप्टेंबर २०२५ मध्ये संंपली आहे. त्यामुळे रितेश जाधव यांना कल्याण डोंबिवली पालिकेत मुदतवाढ द्यावी की नाही यासंदर्भात आपणास कळविण्यात येत आहे. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर आपणास अवगत केले जाईल, असे पालिकेकडून आरोग्य अभियानाच्या साहाय्यक संचालकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आरोग्य अभियान विभागात रितेश जाधव यांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी असल्याची चर्चा आहे. अधिक माहितीसाठी लेखा व्यवस्थापक रिेतेश जाधव यांना संपर्क साधला. आपण एक कर्मचारी आहोत. त्यामुळे प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. त्यांनी स्वताहून खुलासा करण्याची तयारी दर्शवली होती. या खुलाशासाठी जाधव यांनी नापसंती दर्शवली.