कल्याण – कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्यावरील सिंडीकेट येथील ब्राह्मण सोसायटीत चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून सहा लाख ३२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या चोरीप्रकरणी घर मालकाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी आणि अतिशय सुरक्षित ठिकाणी असलेल्या ब्राह्मण सोसायटीत चोरी झाल्याने आता चोरट्यांचा थेट गृहसंकुलात शिरकाव झाल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. दिवाळीनिमित्त अनेक रहिवासी आपल्या मूळ गावी कुटुंबीयांसह गेले आहेत. त्यामुळे ज्या घरांना टाळी आहेत त्या घरांवर पाळत ठेऊन चोरटे या चोऱ्या करत असल्याची पोलिसांची माहिती आहे.

ब्राह्मण सोसायटीमधील गजानन रमेश बाळापूरकर (४९) यांच्या ब्राह्मण सोसायटीमधील नव आशादीप इमारतीत ही चोरी झाली आहे. शनिवारी संध्याकाळी सात ते रविवारी दुपारी चार दरम्यान चोरट्याने ही चोरी केली आहे. तक्रारदार गजानन बाळापूरकर यांनी तक्रारीत म्हटले आहे, की शनिवारी संध्याकाळी काही कामानिमित्त आम्ही कुटुंबीयांसह बाहेर गेलो होतो. त्यावेळी घरात कोणी नाही पाहून चोरट्याने शनिवारी रात्री सात ते रविवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घराच्या दरवाजाच्या कडीकोयंडा तोडला.

घरात घुसून चोरट्याने कपाटातील तिजोरीतील ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन दूरचित्रवाणी संच असा एकूण सहा लाख ३२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी झाली असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्या दिवशी तक्रारदार गजानन बाळापूरकर आपल्या कल्याणमधील घरी आले. तेव्हा त्यांना घराचा कडीकोयंडा तुटलेला असल्याचे दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिले तेव्हा त्यांना घरातील तिजोरीतील सोन्याचा ऐवज आणि घरातील दोन दूरचित्रवाणी संच चोरून नेले असल्याचे आढळले.

कल्याण, डोंबिवली शहरात अलीकडे भुरट्या चोरट्यांचे प्रमाण वाढले आहे. कल्याण रेल्वे स्थानक भागातील बस आगारात भुरट्या चोऱ्यांचा अधिक वावर आहे. प्रवासीसाठी निघालेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज, हातामधील मोबाईल चोरटे चोरून नेत आहेत. गेल्या महिनाभरात सुमारे १० हून महिला प्रवाशांचा लाखो रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

या चोरी प्रकरणाचा महात्मा फुले पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंता हुबे तपास करत आहेत.

तसेच, घरासमोर, सार्वजनिक रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी, रिक्षा चोरण्याचे प्रमाण शहरात अधिक आहे. शहर परिसरात बेसुमार बेकायदा चाळी, झोपडपट्टया उभ्या राहत आहेत. ही बेकायदा निवासे चोरट्यांची आश्रयस्थाने होत आहेत.