निर्दोष असूनही तीन दशके फरफट

सकृद्दर्शनी कोणताही गुन्हा केलेला नसल्याचे सिद्ध होऊनही हलगर्जीपणाचा ठपका ठेवलेले कल्याणमधील एक बडतर्फ गार्ड गेली तीन दशके रेल्वे प्रशासनाकडे न्यायासाठी खेटे घालत आहेत. विशेष म्हणजे दीड वर्षांपूर्वी मुंबई भेटीत दस्तुरखुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही त्यांची कैफियत ऐकून महाव्यवस्थापकांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही रेल्वे प्रशासनाला दयेचा पाझर फुटलेला नाही. ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने वागणूक देण्याचे धोरण अवलंबवणाऱ्या सरकारने संवेदनशीलता दाखवून आता उशिराने का होईना न्याय देण्याचे ‘कर्तव्य’ बजावावे, असे कळकळीचे आवाहन वयोवृद्ध दत्तात्रय मोडक यांनी केले आहे.

१९५८ मध्ये पॉइंटमन म्हणून मध्य रेल्वेच्या कल्याण यार्डात रुजू झालेल्या दत्तात्रय मोडक यांना पुढील काळात ट्रेन क्लर्क तसेच मालगाडी गार्ड अशी बढती मिळाली. २६ एप्रिल १९८३ रोजी पंजाब मेलवर बुकिंग एस्कॉर्ट गार्ड म्हणून ते डय़ूटीवर होते. त्यांच्या दुर्दैवाने त्याच गाडीत असलेले एका बँकेच्या सोन्याची चोरी झाली. त्यामुळे थेट जबाबदार धरून त्यांना अटक करण्यात आली. एक महिना त्यांना कारागृहात डांबण्यात आले. या प्रकरणाची पोलीस तसेच सीआयडी चौकशीही झाली. मात्र अखेर न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. या घटनेनंतर ते पूर्वीप्रमाणे काही वर्षे रेल्वेच्या सेवेत नोकरीही करीत होते. मात्र ३ ऑक्टोबर १९८६ रोजी या चोरीच्या प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवून त्यांना बडतर्फ करण्यात आले. तेव्हापासून त्यांचे दुर्दैवाचे दुष्टचक्र सुरू झाले.

रेल्वे प्रशासनाकडे न्यायासाठी हेलपाटे घालत असतानाच चार मुले, पत्नी अशा संसाराचा गाडा चालवण्यासाठी कल्याणमध्येच एका दुकानात त्यांनी नोकरी पत्करली.

तिथे मिळणाऱ्या महिना चारशे रुपयांमध्ये घरखर्च चालविणे अशक्य होते. त्यामुळे त्यांच्या पत्नी सुमित्रा यांनी घरी  पाळणाघर सुरू करून मुले सांभाळायला सुरुवात केली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. या चोरी प्रकरणातील चोर तर पकडले गेले नाहीत, मात्र गाडीचे गार्ड म्हणून काम करणारे मोडक मात्र गेली तीन दशके न केलेल्या गुन्ह्य़ाची शिक्षा भोगत आहेत.

पेन्शन अदालतीचे आदेश तरीही..

चार वर्षांपूर्वी २०१२ मध्ये पेन्शन अदालतीने मोडक यांची सर्व कैफियत ऐकून त्यांना तातडीने निवृत्तिवेतन सुरू करावे, असे आदेश दिले आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाने अदालतीच्या या निर्णयाकडेही डोळेझाक केली आहे.

…तर किमान सुखाने मरता तरी येईल

गेली ३० वर्षे मी न्यायासाठी झगडतोय. या काळात कुटुंबाची झालेली वाताहत कशानेही भरून निघणार नाही. आता एकच विनंती आहे. माझा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युएटी मला देण्यात यावी. सेवा निवृत्तिवेतन लागू करावे. त्यामुळे माझ्या चारित्र्यावर लागलेला डाग पुसला जाईल.

गेल्या तीस वर्षांत कुटुंबाच्या विवंचनेमुळे धड जगता आले नाही. किमान सुखाने मरता तरी येईल.

-दत्तात्रय मोडक