डोंबिवली : अख्ख आयुष्य निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता म्हणून घालविलेले डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील ज्येष्ठ माजी काँग्रेस नगरसेवक सदाशिव शेलार, माजी नगरसेविका दर्शना शेलार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. अख्ख आयुष्य काँग्रेसमध्ये घालविलेल्या सदाशिव शेलार यांनी अचानक भगवा झेंडा हातात घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोणत्याही परिस्थितीत कल्याण डोंबिवली पालिकेवर शिंदे शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे म्हणून खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण, डोंबिवलीतील विविध पक्षातील अयाराम आपल्या पक्षात घेण्यास सुरूवात केली आहे. त्याच बरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विकास हवा असेल पालिकेवर भाजपचाच महापौर बसला पाहिजे यादृष्टीने भाजप कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. या चढाओढीत कल्याण, डोंबिवलीत महायुतीत एकमेकांचे कार्यकर्ते, पदाधिकारी खेचण्याची स्पर्धा लागली आहे.
कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी चार सदस्य प्रभाग पध्दती आहे. या प्रभाग पध्दतीत शिंदे शिवसेनेने आपले गट कसे निवडून येतील यादृष्टीने जोरदार आखणी केली आहे. या आखणीचा विचार करून इतर पक्षांमधील इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आपल्या सोयीप्रमाणे भाजप, शिंदे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाकुर्ली चोळे, खंबाळपाडा, इंदिरानगर परिसरातून आगामी पालिका निवडणुकीत बाजी मारायची असेल तर काँग्रेसमधून निवडून येणे शक्य नसल्याने आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करून ज्येष्ठ काँग्रेस माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे खंबाळपाडा भागात माजी नगरसेवक साई शिवाजी शेलार विरूध्द सदाशिव शेलार स्वता की त्यांचा मुलगा अजय शेलार निवडणूक लढवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सदाशिव शेलार यांची मुलगी दर्शना या पालिकेत नगरसेविका होत्या. त्यांचा विवाह झाल्यामुळे त्या रिंगणात उतरणार की नाही असाही संभ्रम आहे. ठाकुर्ली खंबाळपाडा भागात सदाशिव शेलार यांचे वर्चस्व आहे. सदाशिव शेलार डोंबिवली शहर पूर्व विभाग ए ब्लाॅकचे अध्यक्ष आहेत. सदाशिव शेलार यांच्या सोबत त्यांचा मुलगा अजय शेलार, हिरामण मोरे, दशरथ म्हात्रे, प्रतिक शेलार, पुण्यदान सरोदे, राहुल पढाडे, मोहन भोसले, ख्वाजा शेख, सलील चौधरी, प्रसाद कीर, विशाल म्हात्रे आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सर्व प्रवेशकर्त्यांचे खासदार शिंदे यांनी स्वागत करून त्यांना आगामी पालिका निवडणुकांचा विचार करून कामाला लागण्याचे आदेश दिले.
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्रनगरचे बाळा म्हात्रे, देवीचापाडा येथील संदेश पाटील, महिला संघटक कविता गावंड, सागर जेधे, जयेश सकपाळ उपस्थित होते.
