शहापूर: वासिंद येथील ईपीएल लिमिटेड कंपनीत मशिन हलवण्याचे काम सुरू असताना, लिबर्टी मशिन कोसळून एका ठेकेदाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
राजू गोपालन (वय ६३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ईपीएल लिमिटेड ही कंपनी शहापूर तालुक्यातील दहागाव (वासिंद) येथे आहे. या कंपनीत शुक्रवारी काम सुरु असताना, लिबर्टी मशिन एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत होती.
वजनदार मशिन हलवताना राजू गोपालन आणि इतर काही कामगार मदतीला होते. दरम्यान, मशिनचे एका बाजूचे चाक अचानक तुटल्याने ती थेट राजू गोपालन यांच्या अंगावर कोसळली. या अपघातात राजू यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
राजू गोपालन हे ईपीएल कंपनीत ठेकेदारीसह वेल्डिंग आणि इतर कामे करीत होते. त्यांच्या मृत्यूमुळे कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या घटनेचा पुढील तपास वासिंद पोलीस करत आहेत.