कल्याण – मुसळधार पाऊस सुरू असताना कल्याण पश्चिमेतील नवीन कल्याण म्हणून विकसित झालेल्या आधारवाडी, गांधारे रोड, वसंती व्हॅली परिसरात गेल्या दहा दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या तीव्र पाणी टंचाईमुळे रहिवासी हैराण आहेत. पालिकेचे आणि चढ्या दरातील खासगी टँकरचे पाणी विकत घेऊन रहिवाशांना पाण्याची गरज भागवावी लागत आहे.

रखरखीत उन्हाळ्यात कधीच पाणी टंचाई जाणवली नाही. गेल्या दहा दिवसापासून धुव्वाधार पाऊस सुरू असताना ही पाणी टंचाई तीव्रतेने जाणवत असल्याने कल्याण पश्चिमेतील गांधारे रोड, आधारवाडी, गोल्डन वोक हाॅटेल समोरील परिसर, वसंत व्हॅली भागातील सोसायट्यांंमधील रहिवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हेही वाचा >>>मुंबई-गोवा महामार्गावरून रवींद्र चव्हाण- श्रीकांत शिंदे यांच्या समर्थकांमध्ये जुंपली; विधानसभेपूर्वी चव्हाण यांना घेरण्याची शिवसेनेची रणनिती

एका सोसायटीत चार ते पाच किंवा काही ठिकाणी त्याहून अधिक इमारती आहेत. वाढीव इमारती असल्या तरी कल्याण डोंबिवली पालिकेच्या नियमाप्रमाणे सोसायटी म्हणून एकच टँकरचे पाणी पाचहून अधिक इमारती असलेल्या एका इमारतीच्या तळटाकीत टाकले जाते. उर्वरित इमारतींमधील रहिवाशांना खासगी टँकरवर अवलंबून रहावे लागते, असे रहिवाशांनी सांगितले. खासगी टँकर एक ते दीड हजार रूपये, पालिकेचा पाण्याचा टँकर ४०० रूपयांना मिळतो.

गेल्या दहा दिवसांपासून पाणी टंचाई असलेल्या सोसायट्यांमध्ये पालिका, खासगी टँकरची वर्दळ आहे. खासगी टँकरचा पाणी दर अधिक असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. खासगी टँकर समुहाचे भले होण्यासाठी ही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण आली आहे का, असे प्रश्न रहिवासी करत आहेत. घरात पाणी नसल्याने नोकरदार असलेल्या काही रहिवाशांंना पाण्यासाठी कार्यालयात सुट्टी घ्यावी लागते.

हेही वाचा >>>बदलापूर: बारवी धरण ८९ टक्क्यांवर, शनिवारच्या मुसळधार पावसाने सात टक्क्यांची भर

कशामुळे टंचाई

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. उल्हास नदीची पात्र दुथडी भरून वाहत आहेत. या पुराचे पाणी मोहिली येथील पालिकेच्या उदंचन केंद्रात घुसते. पुराच्या काळात नदीतून उदंचन केंद्रात पाणी खेचणारी यंत्रणा पाण्याखाली जाते. या यंत्रणेला (फूटवाॅल- त्याखाली स्टेनर) यांना डोंगर, दऱ्यातून वाहून आलेला पालपाचोळा, प्लास्टिक पिशव्या, झाडांच्या फांद्या अडकून बसतात. त्यामुळे उदंचन केंद्रात कमी दाबाने पाणी येते. पुराच्या काळात नदीतून कमी दाबाने पाणी उचलले जाते. त्यामुळे आहे ते पाणी शहराला वितरित केले जाते. मुसळधार पाऊस सुरू असला की पाणी टंचाई जाणवते. काही वेळा मुसळधार पाऊस सुरू असला की सुरक्षितता म्हणून नदीकाठ भागाचा वीज पुरवठा खंडित केला जातो. या कालावधीत नदीतील पाणी उपसा बंद राहतो, अशी माहिती पाणी पुरवठा देखभालीचे ठेकेदार संजय उर्फ बंटीशेठ शहा यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुसळधार पाऊस सुरू असला की नदी पात्रातून पुरेशा दाबाने पाणी उचलताना अडचणी येतात. त्यामुळे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. गांधारे, आधारवाडी भागात सुरळीत पाणी पुरवठा आहे. तरीही तेथे काही तांत्रिक अडचण असेल तर ती तातडीने सोडविण्याचे काम करून घेतो.– अशोक घोडे कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग.