उल्हासनगरः आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उल्हासनगर शहराच्या वेशीवर असलेल्या शहाड रेल्वे स्थानकाजवळ थांबलेल्या राज ठाकरेंनी स्थानकाच्या नामफलकाकडे पाहिले. शहाड रेल्वे स्थानकाचे हिंदी रूपांतर शहद का असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला. शहाडचे हिंदी पण शहाडच होईल ना, असा सवाल करत राज ठाकरेंनी ते बदलायला सांगा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला.
कार्यकर्त्यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाला पत्र देत नाव बदलण्याची विनंती केली. रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वे स्थानकावरील शहद नावाचा उल्लेख पुसून तेथे शहाड केले. वर्षानुवर्षे लिहिलेल्या रेल्वेच्या शहद नावाचा उल्लेख या निमित्ताने इतिहासजमा झाला. शहाड गावावरून या स्थानकाला शहाड नाव देण्यात आले होते. मात्र त्यांचे हिंदी रूपांतरण शहद असे केले जात होते.
ब्रिटीशकाळात १६ एप्रिल १८५३ रोजी बोरिबंदर ते ठाणे ही पहिली रेल्वे धावली. त्यानंतर टप्प्याटप्याने रेल्वे सेवेचा विस्तार करण्यात आला. ठाणे रेल्वे स्थानकापुढे कल्याण स्थानकापर्यंत रेल्वेचा विस्तार झाला. साधारणतः वर्षभरात कल्याण रेल्वे स्थानकाला सुरूवात झाली. पुढे याच रेल्वे मार्गिकांचा खोपोली आणि कसारापर्यंत विस्तार झाला. यात सुरूवातील काही स्थानकांचा विस्तार करण्यात आला. यात कल्याण जवळचे सर्वात पहिले स्थानक हे शहाड म्हणून नावारूपाला आले.
८ मार्च १९५४ रोजी शहाड रेल्वे स्थानक सुरू झाले अशी नोंद आढळते. शेजारी असलेल्या शहाड गावावरून या स्थानकाला शहाड असे नाव दिले गेले. औद्योगिक वसाहत आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागासह उल्हासनगरसाठी हे स्थानक फायदेशीर ठरले. मात्र या स्थानकाच्या तीन भाषांमध्ये केलेला उल्लेख हिंदी भाषेत अनेकदा चर्चेचा विषय ठरला.
उल्हासगनर : शहाड रेल्वे स्थानकाचे हिंदी रूपांतर शहद का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विचारला. शहाडचे हिंदी पण शहाडच होईल ना, असा सवाल करत राज ठाकरेंनी ते बदलायला सांगा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला. कार्यकर्त्यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाला पत्र देत नाव बदलण्याची… pic.twitter.com/oJHYTyse9V
— LoksattaLive (@LoksattaLive) September 23, 2025
शहाड या गावाचे नाव हिंदीतून शहद असे रूपांतर करण्यात आले. मुळात शहद या शब्दाचा काहीही संबंध लागत नाही. मात्र चुकीच्या पद्धतीने हिंदीत रूपांतर करण्यात आले होते. नुकतेच राज ठाकरे यांनी अंबरनाथ, उल्हासनगर शहरातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी शहाड रेल्वे स्थानकाजवळ कार्यकर्त्यांना भेटत असताना राज ठाकरे यांच्या नजरेस शहाड रेल्वे स्थानकाचा नामफलक पडला. त्यांनी याबाबत कार्यकर्त्यांना विचारणा केली.
शहाडचे हिंदी रूपांतर शहद कसे. शहद नावाचा काही संदर्भ आहे का. मात्र तसा काही संदर्भ नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर ते नाव बदलून घ्या असे राज ठाकरे यांनी सूचवले. त्यानंतर स्थानिक मनसे शहर अध्यक्ष संजय घुगे, जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहाड रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना याबाबत पत्र दिले. तातडीने चुकीचा उल्लेख बदलून शहाड असा करावा अशी विनंती त्यात करण्यात आली होती. तसेच आठ दिवसात नाव न बदलल्यास त्याविरूद्ध तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला होता.
मनसेच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वे स्थानकावरील शहद असा उल्लेख पुसला. ज्या ठिकाणी तो तात्काळ बदलणे शक्य नव्हता, त्या ठिकाणी तो झोकण्यात आला. तर रेल्वे फलाटावरील पिवळ्या फलकावर शहद ऐवजी हिंदी भाषेतही शहाड असाच उल्लेख करण्याता आला. राज ठाकरेंच्या या नजरेने हेरलेली चूक वर्षानुवर्षे रेल्वे प्रशासनामुळे खपवून घेतली गेली. मुळात शहाड गावावरून ज्या स्थानकाला नाव पडले ते शहद हिंदीतून करण्यात काही अर्थ नव्हता. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले. अखेर शहदचे शहाड झाल्याने मनसेसह रेल्वे प्रवाशांनी आणि स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.