Ganesh Visarjan 2025: Thane News : शहापूर : ठाणे जिल्ह्यात अनंत चतुर्दशी निमित्ताने गणेश विसर्जन मिरवणूकांची धामधूम सुरु असताना शहापूर तालुक्यात एक दु:खद घटना घडली आहे. एका गणेशोत्सव मंडळातील पाच कार्यकर्ते बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध घेणे शक्य झाले आहे. तर इतर दोघांचा रात्री उशीरापर्यंत शोध सुरु होता. या घटनेमुळे शहापूरात शोककळा पसरली आहे.
प्रतीक मुंडे असे मृत तरुणाचे नाव असून बचाविलेले रामनाथ घारे, भगवान वाघ यांच्यावर शहापुर उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कुलदीप जाखेरे आणि दत्ता लोटे यांचा जीव रक्षक टीम व शिवतेज मित्र मंडळातील तरुणांकडून शोध सुरू होता.
अनंत चतुर्दशी निमित्ताने १० दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. ठाणे जिल्ह्यात उत्सवात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूका निघाल्या होत्या. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नदी, बंधाऱ्यामध्ये गणेशमूर्ती विसर्जनाची परंपरा आहे. परंतु या ठिकाणी एक दुर्घटना घडली आहे.
गणेशमूर्ती विसर्जनापूर्वी आरती सुरू असताना नजीकच्या लहान बंधाऱ्यातून पोहण्यासाठी उडी मारलेल्या तरुणाला वाचविण्यासाठी गेलेले पाच तरुण बुडाल्याची घटना आसनगाव येथील रेल्वे पुलाखालून वाहणाऱ्या भारंगी नदीत घडली. पाच तरुणांचा शोध सुरू असताना एक तरुणाचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे तर वाचविण्यात यश आलेल्या दोघांवर शहापुर उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरू आहेत. आसनगाव येथील मुंडेवाडी येथील शिवतेज मित्र मंडळाच्या गणपती विसर्जनाची तयारी सुरू असताना शनिवारी साडेसहा च्या सुमारास ही घटना घडली.
नेमके काय झाले ?
भारंगी नदी काठी मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जनाआधी आरती सुरू होती. त्यावेळी दत्ता लोटे हा पोहण्यासाठी नजीकच्या बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या भारंगी नदीत गेला होता. गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असल्याने भारंगी नदीतील पाण्याचा अंदाज दत्ता याला आला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी प्रतीक मुंडे, रामनाथ घारे, भगवान वाघ व कुलदीप जाखेरे यांनीही पाण्यात उड्या मारल्या. परंतु ते देखील बुडाले.
यावेळी प्रसंगावधान दाखवित मित्रांच्या मदतीने योगेश्वर नाडेकर याने पाण्यात उतरून रामनाथ व भगवान या दोघांना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर जीवरक्षक टीम व मंडळातील कार्यकर्त्यांनी शोध घेतल्यानंतर प्रतीक मुंडे या तरुणाला बाहेर काढले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, कुलदीप जाखेरे व दत्तू लोटे या तरुणांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.