शहापूर : येथील नामांकित शाळेत स्वछतागृहात रक्त सांडल्याचे आढळून आल्यानंतर सुमारे सव्वाशे विद्यार्थीनींची गणवेश उतरवून तपासणी करण्यात आल्याचा निंदनीय प्रकार उघड झाला होता. अखेर पाच दिवस बंद असलेली ही शाळा मंगळवारपासून (आज) सुरू करण्यात येणार आहे. तसेच, सॅनिटरी पॅड उपलब्ध व नष्ट करण्याच्या यंत्रासह विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधांची पूर्तता एक महिन्यात करून देण्याचे आश्वासन संस्थेच्या समन्वयकांनी दिले. या दरम्यान, विद्यार्थ्यांचे महिला बाल विकास विभागाच्या माध्यमातून समुपदेशनही करण्यात आले आहे.

शहापुरमधील एका नामांकित शाळेतील स्वच्छतागृहात रक्ताच्या डागांचे ठसे आढळून आल्याने मुलींचे गणवेश उतरवून तपासणी करण्याचा प्रकार ८ जुलैला घडला होता. या प्रकारामुळे संतप्त पालकांनी दुसऱ्या दिवशी शाळेवर धडक देऊन मुख्याध्यापकांना घेराव घालत जाब विचारला होता. संस्था चालकांकडून या प्रकरणावर कार्यवाही होत नसल्याने मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली होती.

त्यानंतर मुख्याध्यापकांसह महिला कर्मचारी, चार शिक्षिका आणि दोन संस्था चालक यांच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच ही शाळा बंद करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सुरू करण्याची मागणी पालकांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर या शाळेत शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक मुकेश ढगे, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र विशे यासह शिक्षक आणि पालक यांची बैठक झाली. त्यामध्ये सुमारे १५० पालक उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून तात्काळ शाळा सुरू करून शाळेत सॅनिटरी पॅड उपलब्ध व नष्ट करण्याच्या यंत्रणा तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पालकांनी केली. संस्थेच्या कार्यकारी मंडळाची स्थापना करून त्यात पालकांचा समावेश करणे, तक्रार पेटी उपलब्ध करणे आदी मागण्यांची पूर्तता एक महिन्यात करण्याचे आश्वासन संस्थेचे समन्वयकांनी दिले.