शहापूर : शहापुर तालुक्यातील तानसा अभयारण्य परिसरात पक्षी सप्ताहाची दमदार सुरुवात झाली असून वेहळोली येथील पाझर तलावावर पहिल्याच दिवशी तब्बल २३ रंगीबेरंगी पक्षी प्रजातींची नोंद झाली आहे. अडई, हरिद्र, कोतवाल, शिंपी, वेडा राघू, नदीसुरय, तिसा यांसह अनेक दुर्मिळ आणि नयनरम्य पक्ष्यांचे विलोभनीय दर्शन झाल्याने पक्षीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पुढील आठवड्यात ९० ते १०० पेक्षा अधिक पक्षी प्रजाती निरीक्षणात येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

वन्यजीव संरक्षणकर्ते पद्मश्री मारुती चितमपल्ली आणि भारताचे पक्षी मानव पद्मभूषण डॉ. सालिम अली यांच्या जयंती निमित्ताने राज्यात ०५ ते १२ नोव्हेंबर पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतो. त्यानुसार, शहापुर तालुक्यातील तानसा अभ्यारण्यासह वनविभागाच्या डोळखांब, जांभे, भातसा, तानसा, मोडकसागर आदि परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात येणार आहे.

तानसा वन्यजीव विभाग, शहापुर वनविभाग आणि आउल कंझर्वेशन फाउंडेशन यांच्या माध्यमातून पक्षीमित्र आणि वन्यजीव अभ्यासक रोहिदास डगळे, भूषण विशे, सागर वेहळे, प्रशांत शिराळ, भार्गव लाड, योगेश शिद, अक्षय गहरे या शहापुर तालुक्यातील पक्षीमित्रांनी खातीवली – वेहळोलीच्या पाझर तलाव जवळ तळ ठोकून पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली. याठिकाणी विशेष हिवाळी पाहुणे नदीसुरय, राखी धोबी, दलदली ससाणा दिसून आले.

तर, सामान्यपणे आपल्या भागात आढळणारे बगळे, पाणकावळा, राखी पाकोळी, अडई, हरिद्र, कोतवाल, शिंपी, वेडा राघू, शिक्रा, कोतवाल, हळद्या, तिसा अशा विविध २३ पक्षी प्रजातींचा मुक्त विहार आढळून आला आहे. या विविध रंगीबेरंगी विहंगांमुळे तानसा अभयरण्यासह वनविभागाचा परिसर बहरून निघाला आहे.