ठाणे: ठाणे शहरातील वाढता भ्रष्टाचार, पाण्याची टंचाई, वाहतूक कोंडी आणि स्मार्ट सिटीतील अपयश या सर्व मुद्द्यांवरून ठाणेकरांच्या मनात प्रचंड आक्रोश निर्माण झाल्याचे मुद्दे मांडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच शंकर पाटोळे हा ठाणे महापालिकेचा चेहरा आहे, असा आरोपही त्यांनी केला.
वाहतूक कोंडी, भ्रष्टाचार, पाणी समस्या यांसह विविध स्थानिक मुद्द्यांवरून सोमवारी शिवसेना (उबाठा), मनसे, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त मोर्चा काढला. यामध्ये ते बोलत होते. ठाणेकरांच्या मनात आक्रोश आहे, त्यामुळे ठाण्याला भ्रष्टाचारापासून वाचवायचे असेल तर आम्हाला एकत्र यावे लागेल. शाही धरण अद्याप पूर्ण झाले नाही, कारण टेंडर कोण काढणार यावरूनच अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यामुळे आजही ठाणेकर तहानलेला आहे. चुकलेल्या धोरणांमुळे ठाण्याची वाट लावली आहे. वाहतूक कोंडीने ठाणेकर त्रस्त आहेत, असे आव्हाड म्हणाले.
पाटोळे हा महापालिकेचा चेहरा
शंकर पाटोळे हा ठाणे महापालिकेचा चेहरा आहे. तो त्या पदावर नुसता बसला नव्हता, त्यासाठी त्याने दाम मोजले होते, म्हणून तो वसुली करत होता. पण तो त्या पदाला लायक होता का? आमदार संजय केळकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री ऐकत नाहीत का? त्यांनी वारंवार ठाणे महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा असल्याचे सांगितले आहे, असे आव्हाड म्हणाले.
श्वेत पत्रिका काढावी
महापालिकेतील अधिकाऱ्यांना दिलेली प्रमोशन्स योग्य आहेत का? हे जाहीर करावं, त्याची श्वेत पत्रिका काढावी. नगरसेवक विकले जातात, प्रत्येक माणसाचा भाव ठरलेला आहे. ठाण्याचे वाटोळे करणारे हेच दरोडेखोर आहेत. त्यांना रोखण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल, नाहीतर ठाणेकर माफ करणार नाहीत, असे आव्हाड म्हणाले.
पिक्चर अभी बाकी है!
आज आपण ठाण्याकरांसाठी एकत्र आलो आहोत. पक्ष वेगळे असले तरी ठाण्याच्या हितासाठी आपण एकत्र उभे राहणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांचा माज उतरवायचा असेल तर मतमतांतर बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर एकत्र काम करावे लागेल, असे आव्हाड यांनी मोर्चात सामील झालेल्या विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले. आता ही फक्त सुरुवात आहे… पिक्चर अभी बाकी है!, असेही ते म्हणाले.